Raj and Uddhav Thackeray came together and sounded election trumpet : राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
Mumbai: गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेली शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर बुधवारी अधिकृतपणे जाहीर झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत मनसे – ठाकरे गटाच्या युतीची घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबईसह सात महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत निवडणुकीच्या रणांगणात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी दादर येथील शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थ स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होते. या दर्शनानंतर वरळीत झालेल्या पत्रकार परिषदेकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे लक्ष लागले होते.
Local Body Elections : चांदूरबाजारात मुस्लीम मतदारांनी जुळवले प्रहारचे गणित
पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी युतीची अधिकृत घोषणा करताना स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे. यामागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही वादापेक्षा किंवा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, असे त्यांनी यापूर्वी म्हटले होते आणि त्याच विचारातून या युतीची सुरुवात झाली. सध्या कोण किती जागा लढवणार, याबाबत माहिती देणार नसल्याचे सांगत त्यांनी टोमणात्मक शैलीत राजकीय पक्षांतील फोडाफोडीवरही भाष्य केले. उमेदवारांना अर्ज कधी भरायचे, याची योग्यवेळी माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी यावेळी मराठी माणसाला आणि महाराष्ट्रप्रेमी जनतेला आवाहन करत, ज्यांचे महाराष्ट्रावर आणि मुंबईवर प्रेम आहे त्यांनी या युतीच्या पाठीशी उभे राहावे, असे म्हटले. तसेच मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो आमचाच असेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Ravi Rana Vs. Balwant Wankhede : ‘राणाच्या थोबाडीत मारली’ गाण्यावरून राजकारण पेटले
यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपला मुंबईचे लचके तोडायचे असून मुंबईची चिंधड्या करायच्या आहेत, असा आरोप त्यांनी केला. आम्ही जर सतत भांडत राहिलो, तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान होईल, असे सांगत ही युती कर्तव्य म्हणून करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आम्ही एकत्र आलो आहोत, ते कायम एकत्र राहण्यासाठीच, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्राकडे जो कोणी वाकड्या नजरेने पाहील, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही दिला. विधानसभा निवडणुकीत भाजपकडून ‘कटेंगे तो बटेंगे’ असा अपप्रचार करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी मराठी माणसाला थेट आवाहन केले की, आता चुकाल तर संपाल, त्यामुळे मराठीचा वसा टाकू नका.
Sudhir Mungantiwar : पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २० हजार बोनस द्या
या पत्रकार परिषदेमुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती औपचारिकरित्या अस्तित्वात आली असून, मुंबईसह सात महानगरपालिकांमध्ये ही युती एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये या युतीचा मोठा परिणाम दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
__








