Vanchit Bahujan Aghadi : पहिला डाव वंचितचा, उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Uncertainty remains regarding the alliance. : महापालिका निवडणुकीतील आघाडीबाबत अनिश्चिततेचे सावट कायम

Akola : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने राज्यातील पहिली उमेदवार यादी बुधवारी जाहीर करत निवडणूक रणधुमाळीला सुरुवात केली आहे. अकोला महापालिकेसाठी वंचितकडून पहिल्या यादीत पाच उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून, काँग्रेससह इतर पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत अद्याप अनिश्चिततेचे सावट कायम असल्याचे चित्र आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले असतानाच युती आणि आघाडीचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच वंचितने पहिली उमेदवार यादी जाहीर करून पुढचे पाऊल टाकले आहे. मात्र ज्या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्या वगळून उर्वरित जागांवर आघाडी करण्याचे दारे वंचितने अद्याप खुले ठेवले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या पहिल्या यादीला अंतिम मान्यता दिली. त्यानंतर ही यादी जाहीर करण्यात आली.

Local Body Elections : पालिका निवडणुकीत शहराध्यक्षांनाच घरचा रस्ता!

अकोला महापालिकेसाठी दोन प्रभागांतील पाच उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक सात अ मधून किरण महेंद्र डोंगरे, सात ड मधून महेंद्र देविदास डोंगरे, तर प्रभाग क्रमांक नऊ अ मधून चंदू सिरसाट, नऊ ब मधून नाज परवीन शेख वसीम आणि नऊ क मधून शमीम परवीन कलीम खान पठाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ही यादी जाहीर करताना अकोला पूर्व महानगराध्यक्ष नीलेश देव, पक्ष सल्लागार बालमुकूंद भिरड, गजानन गवई, पराग गवई यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाकडून निवडणूक तयारीबाबत आत्मविश्वास व्यक्त करण्यात आला.

वंचित बहुजन आघाडी भाजप वगळता इतर पक्षांसोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे याआधीच स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र काँग्रेसकडून जिल्हा किंवा प्रदेश पातळीवरून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव प्राप्त झालेला नसल्याची माहिती जिल्हा प्रभारी नातिकोद्दिन खतीब यांनी दिली. त्यामुळे सध्या तरी स्वबळावर निवडणूक लढण्याची पूर्ण तयारी पक्षाने केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Sarangwadi Case : एसआयटी चौकशी केवळ दिखावा ठरणार? सारंगवाडी घोटाळ्यात ‘क्लीन चिट’ची आखणी सुरू!

पक्षाकडे तब्बल 80 जागांसाठी उमेदवार तयार असून उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांचा मान-सन्मान राखणे आणि त्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणे ही वंचितची प्राथमिकता असल्याचे सांगत, त्या पार्श्वभूमीवर पहिली यादी जाहीर करण्यात आल्याचे खतीब यांनी नमूद केले. आघाडीबाबत कोणताही ठोस प्रस्ताव आल्यास त्यावर अंतिम निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.