Warning that if the nationalists come together, they will fight on their own : राष्ट्रवादी एकत्र आल्यास ‘स्वबळावर लढू’ असा इशारा
Pune: राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर होताच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. मुंबईनंतर आता पुण्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूक लढवण्यावरून एकमत नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढवणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट इशारा दिला असून, अशी परिस्थिती उद्भवल्यास काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असे स्पष्ट केले आहे.
विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. या संदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू होती. मात्र, जर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार असतील तर काँग्रेससमोर पर्याय उरणार नाही आणि पक्षाला स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी लागेल. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील महाविकास आघाडीची रणनीती पुन्हा अडचणीत सापडली आहे.
BMC Election 2026: राज–उद्धव ठाकरे यांची युती जाहीर होताच भाजप सतर्क
याआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर काँग्रेसने उघडपणे असमाधान व्यक्त केले. मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षासोबत लढवण्याची काँग्रेसची तयारी होती, मात्र मनसेसोबत जाण्याची तयारी नव्हती, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले होते.
शिवसेना (ठाकरे) आणि मनसे युतीबाबत बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मराठी अस्मिता आणि संस्कृतीचा मुद्दा उपस्थित केला. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू असून मुंबईवर गुजरातचे नियंत्रण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी अस्मिता आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लढण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले याबाबत त्यांनी शुभेच्छा दिल्या असल्या तरी काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, वर्षा गायकवाड यांनीही ठाकरे बंधूंच्या युतीवर आपली भूमिका मांडली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार हे आधीपासूनच माहीत होते, त्याबाबत चर्चा सुरू होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असून पक्षासाठी विचारधारा महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाज जोडणारे आम्ही आहोत, समाज तोडणाऱ्यांसोबत जाणार नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
ठाकरे बंधूंनी युती करताना काँग्रेसला विचारात घेतले नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही, असा दावाही वर्षा गायकवाड यांनी केला. समाजातील दरी दूर करणे हे काँग्रेसचे ध्येय असून त्यामुळे तोडफोडीच्या राजकारणासोबत जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
Municipal election : आमच्याकडे विकासाचा, तर त्यांच्याकडे खुर्चीचा अजेंडा*”
एकीकडे मुंबईत ठाकरे बंधूंची युती, तर दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादीच्या संभाव्य एकत्र येण्यावरून काँग्रेसची नाराजी, यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ही फूट आघाडीच्या राजकारणाला किती महागात पडणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.








