Municipal election : विधानसभेत चालते, पण मुंबई महापालिकेत नाही?

Anjali Damania strong criticism on Nawab Malik : नवाब मलिकांवरून अंजली दमानियांची तीव्र टीका

Mumbai: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती-आघाड्यांचं राजकारण तापलेलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका पोस्टमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील राजकीय विसंगतीवर बोट ठेवत दमानिया यांनी समाज माध्यमातवरून जोरदार टीका केली आहे. भाजपाला नवाब मलिक असलेला अजित पवार गट विधानसभेत चालतो, मात्र मुंबई महापालिका निवडणुकीत तो चालत नाही, हे नेमकं कोणतं राजकारण आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती, वंचित आघाडी आणि काँग्रेसची आघाडी, तर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी अशा घडामोडी घडत असताना मुंबईत मात्र भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं सूत जुळलेलं नाही. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी पोस्ट शेअर करत सत्तेच्या गणितावर तत्त्वे आणि विचारसरणी गहाण टाकली जात असल्याची टीका केली आहे.

Maharashtra politics : सत्ताधारी गोंधळात, विरोधक दिशाहीन!

दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची भाषा केली जाते, मग दोन्ही राष्ट्रवादी केवळ पिंपरी-चिंचवडपुरत्याच एकत्र का येतात? संपूर्ण महाराष्ट्रात एकत्र येण्याची इच्छाशक्ती, हिंमत आणि प्रामाणिकपणा नाही का? की विकास, विचारसरणी आणि तत्त्वे सत्तेच्या गणितापुढे दुय्यम ठरत आहेत? भाजपाला नवाब मलिक असलेला अजित पवार गट विधानसभेत चालतो, पण मुंबई महापालिकेत चालत नाही, हे अजब राजकारण असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी संध्याकाळी ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश असल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. भाजपाने पूर्वी नवाब मलिक यांच्या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला असतानाही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्यात आल्याने विरोधाभास दिसत आहे.

नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, २०१७ मध्ये त्या स्वतः १६५ क्रमांकाच्या प्रभागातून उमेदवार होत्या, तर त्यांच्यासोबत आत्या सईदा खान आणि काका कप्तान मलिक हेही उमेदवार होते. यावेळी पुन्हा सईदा खान आणि कप्तान मलिक यांना उमेदवारी देण्यात आली असून कप्तान मलिक यांच्या सून बुशरा मलिक यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. मुंबईत स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली असून अंतिम निर्णय झाल्यास कुटुंबातील हे तिघेही निवडणूक लढवतील, असं सना मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

Municipal election : परिवार पुन्हा एकत्र येतोय’अजित पवारांचे सूचक वक्तव्य

मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची युती न होण्यामागे नवाब मलिक हे प्रमुख कारण असल्याचं यापूर्वी सांगितलं जात होतं. भाजपाच्या काही नेत्यांनी नवाब मलिक यांच्या मुंबईतील नेतृत्वाला जाहीरपणे विरोधही केला होता. मात्र, आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुद्द्यावर वेगळी भूमिका मांडली आहे. बावनकुळे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, पण ते अद्याप सिद्ध झालेले नाहीत. मुंबईत राष्ट्रवादीसोबत युती करायची नाही, हा निर्णय दोन्ही पक्षांच्या बैठकीत आधीच झाला होता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांच्या पोस्टमुळे सत्ताधारी पक्षांच्या भूमिकांतील विसंगती, तत्त्वांपेक्षा सत्तेला दिलं जाणारं प्राधान्य आणि निवडणूकनिहाय बदलणाऱ्या भूमिका यावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.