64 corporators unopposed in 29 municipalities, BJP in the lead : २९ महापालिकांमध्ये ६४ नगरसेवक बिनविरोध, भाजप आघाडीवर
Mumbai: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच मतदानापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेत विजयाचा गुलाल उधळला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्ष, अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे राज्यभरात महायुतीचे तब्बल ६४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान होण्याआधीच महायुतीने महापालिका निवडणुकांमध्ये अर्धशतक पूर्ण केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या कालावधीत भाजपाने नाराज नेते आणि बंडखोरांची समजूत काढण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवले. त्याचवेळी काही ठिकाणी प्रमुख विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने महायुतीच्या अनेक जागा बिनविरोध झाल्या. विशेष म्हणजे या बिनविरोध विजयांमध्ये भाजपाने आघाडी घेतली असून एकट्या भाजपाचे ४४ उमेदवार मतदानाविना नगरसेवक झाले आहेत. सत्तेतील दुसरा घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार मतदानापूर्वीच विजयी झाले आहेत. याशिवाय मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीचा एक उमेदवारही बिनविरोध निवडून आला आहे.
Ajit Pawar : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही; महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली
जळगाव महापालिकेत महायुतीचा चांगलाच प्रभाव दिसून आला असून येथे एकूण १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सहा आणि भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार आहेत. अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक सात ‘ब’ मधून भाजपाच्या उमेदवार पुष्पा बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पनवेल महापालिकेतही महायुतीला मोठा फायदा झाला असून अपक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अचानक माघार घेतल्यामुळे सात जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीचा विशेष बोलबाला पाहायला मिळाला आहे. येथे एकूण १८ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून त्यात भाजपाचे १५ तर शिंदेसेनेचे सहा उमेदवार आहेत. ऐनवेळी अपक्षांसह काँग्रेस, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत मतदानापूर्वीच महायुतीने विजयी जल्लोष साजरा केला आहे.
ठाणे महापालिकेतही शेवटच्या दिवशी राजकीय चित्र झपाट्याने बदलले. ठाणे महापालिकेसाठी सुरुवातीला १,१०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर ९९ अर्ज बाद झाले, तर १ जानेवारी रोजी २७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. मात्र अंतिम दिवशी, म्हणजे २ जानेवारीला, मोठ्या प्रमाणावर माघारी झाल्याने वागळे इस्टेट आणि वर्तकनगर परिसरात शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले.
एकूणच राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये मतदानापूर्वीच महायुतीने मोठी आघाडी घेतली असून बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येमुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. या घडामोडींमुळे उर्वरित जागांवरील निवडणूक लढतींवरही या बिनविरोध विजयांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
__








