Teachers union angry over administrations chaos : प्रशासनाच्या गोंधळावर शिक्षक संघटना संतप्त
Mumbai : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच प्रशासनाच्या कारभाराचा अजब आणि धक्कादायक नमुना समोर आला आहे. निवडणूक कामासाठी गैरहजर राहणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा देणाऱ्या नोटिसा थेट दोन मृत शिक्षकांच्या नावाने पाठवण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर शिक्षक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर ड्युटी लावण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेत कोणतीही योग्य पडताळणी न करता थेट आदेश काढल्याचा आरोप होत आहे. या गोंधळात दोन शिक्षकांचा मृत्यू झालेला असतानाही त्यांना निवडणूक ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. एवढेच नव्हे तर संबंधित शिक्षक गैरहजर राहिल्याचे कारण दाखवा नोटिसाही त्यांना पाठवण्यात आल्या आहेत.
Municipal elections : राज्यात मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक
जिल्हा परिषद शिक्षक संघटनेचे पदाधिकारी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. संबंधित दोन शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती यापूर्वीच संघटनेमार्फत प्रशासनाला देण्यात आली होती. तरीही मयत शिक्षकांना हजर न राहिल्याने नोटीस देण्यात आली, हा प्रशासनाचा गंभीर हलगर्जीपणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आदेश काढताना साधी माहितीही तपासली जात नाही, हे या प्रकरणातून स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.
निवडणूक कामकाजात केंद्राध्यक्ष पदाच्या नेमणुकीवरही संघटनेने आक्षेप घेतला आहे. वय आणि अनुभवाचा कोणताही विचार न करता केवळ तीन-चार वर्षांचा अनुभव असलेल्या शिक्षकांना केंद्राध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली, तर अनेक वरिष्ठ आणि अनुभवी शिक्षकांना खालच्या पदावर ठेवण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा पद्धतीने काम वाटप केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेत गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ५० हजार शासकीय कर्मचारी असताना इतर विभागातील कर्मचाऱ्यांना न घेता प्रामुख्याने शिक्षकांनाच निवडणूक कामासाठी जुंपण्यात आल्याचे चित्र आहे. दोन शिक्षकी शाळांमधील दोन्ही शिक्षकांना ड्युटी लावल्यामुळे अनेक शाळा बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. केवळ जिल्हा परिषद शिक्षकांवर भार न टाकता इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाही निवडणूक कामात सहभागी करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
काही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या असतानाही त्यांच्या जुन्या शाळांच्या पत्त्यावर आदेश पाठवण्यात आले. एवढी प्रगत तंत्रज्ञान व्यवस्था असताना डेटामध्ये इतक्या मोठ्या चुका कशा राहतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिथे शिक्षक कार्यरतच नाहीत तिथे ऑर्डर पाठवून, प्रशिक्षणाला हजर न राहिल्यामुळे कारणे दाखवा नोटीस देणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मयत शिक्षकांनाही ड्युटी लावली जाते, मग त्यांच्या नावाने आलेली ऑर्डर स्वर्गात कोण पोहोचवणार, असा खोचक सवाल करत त्यांनी प्रशासनावर टीका केली.
Ajit Pawar : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही; महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली
निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले की, महानगरपालिका निवडणुकीसाठी सुमारे ८ हजार कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डाटा जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाला होता. यापैकी अनेक कर्मचारी कामकाजाला हजर न राहिल्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या. ८ हजारांपैकी काही शिक्षक गैरहजर होते. अधिकृत कारण दिलेल्यांना वगळता सुमारे १२०० शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. या यादीत मृत शिक्षकांचाही समावेश झाला, कारण त्यांच्या मृत्यूबाबत संबंधित संस्थेकडून अधिकृत माहिती प्रशासनाला देण्यात आलेली नव्हती, असा दावा त्यांनी केला.
तरीही मृत शिक्षकांना नोटिसा पाठवल्याच्या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शिक्षक संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.








