Mandatory to submit election expense accounts within 30 days : ३० दिवसांची अंतिम मुदत; चुकल्यास थेट सहा वर्षांची अपात्रता!
Buldhana नगरपालिका निवडणूक संपली असली, तरी उमेदवारांसाठी आता खरी कसोटी सुरू झाली आहे. प्रचार, सभा आणि मतांची लढाई संपल्यानंतर आता निवडणुकीतील खर्चाचा काटेकोर हिशेब सादर करण्याचे आव्हान सर्व उमेदवारांसमोर आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या ३० दिवसांच्या आत विजयी व पराभूत अशा सर्वच उमेदवारांना निवडणूक खर्चाचा सविस्तर अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
निवडणूक प्रचारासाठी घेतलेल्या सभा, कोपरा सभा, मंडप, ध्वनिक्षेपक, खुर्च्या, फ्लेक्स, बॅनर आदी प्रत्येक खर्चाचे मूळ बिले, तसेच फोटो व व्हिडिओ स्वरूपातील पुरावे सादर करावे लागणार आहेत. केवळ कागदी हिशेब नव्हे, तर प्रत्यक्ष पुराव्यांचीही कसून तपासणी केली जाणार आहे.
Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होणार
प्रचारादरम्यान १० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा कोणताही व्यवहार रोखीने करण्यास बंदी होती. सर्व व्यवहार चेक, आरटीजीएस किंवा ऑनलाइन पद्धतीनेच करणे बंधनकारक होते. यासाठी प्रत्येक उमेदवाराला स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले होते. त्या खात्याच्या पासबुकाची प्रत तपासणीसाठी निवडणूक यंत्रणेकडे सादर करावी लागणार आहे.
निवडणूक खर्चाचा हिशेब विहित वेळेत सादर न केल्यास संबंधित उमेदवारावर पुढील सहा वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्याची कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे सर्व उमेदवारांनी वेळेची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
निवडणूक विभागाने आधीच दरनिश्चितीचा ‘रेट चार्ट’ जाहीर केला होता. हॉटेलचे बिल किंवा इतर खर्च प्रत्यक्षात कमी असले, तरी विभागाने ठरवून दिलेल्या दरानुसारच खर्च ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे दाखवलेला आणि प्रत्यक्ष खर्च यामध्ये तफावत राहणार नाही, याची खबरदारी उमेदवारांना घ्यावी लागणार आहे.
खर्च नियंत्रण पथकांकडून दैनंदिन खर्च वही, बिले आणि पुरावे यांची तपासणी ३० दिवसांच्या आत करण्यात येणार आहे. खर्चाच्या आकड्यांमध्ये तफावत आढळल्यास संबंधित उमेदवाराला नोटीस बजावून खुलासा मागवला जाणार आहे.
Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,
खर्च मर्यादा ओलांडली जाऊ नये आणि निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी निवडणूक काळात खर्च नियंत्रण पथके आणि भरारी पथके सक्रिय ठेवण्यात आली होती. आता अंतिम टप्प्यात संपूर्ण खर्चाचा अधिकृत हिशेब सादर करणे उमेदवारांना अपरिहार्य ठरणार आहे.








