After election results, 21 BJP members head towards Shinde Shivsena : २१ जण शिंदेसेनेच्या वाटेवर, पालिका निकालानंतर भाजपमध्येच राजकीय भूकंप
Buldhana पालिका निवडणूक संपली असली, तरी निकालानंतर उडालेला राजकीय धुरळा अद्याप खाली बसलेला नाही. जिल्ह्यात सर्वाधिक ३१ टक्के जागा जिंकून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपमध्येच आता अंतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. वरिष्ठ पातळीवर सत्तासमीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना, बुलढाणा जिल्ह्यात मात्र भाजपअंतर्गत ‘निष्ठावान’ आणि ‘उपरे’ अशा दोन गटांतील संघर्ष विकोपाला गेला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपमधील निष्ठावान म्हणवणारे तब्बल २१ कार्यकर्ते शिंदेसेनेची कास धरण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यासाठी ४ जानेवारीचा मुहूर्त ठरल्याची माहिती असून, या संभाव्य घडामोडीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे.
Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होणार
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उदय देशपांडे यांनी १७ डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी आमदार डॉ. संजय कुटे आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यावर पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले. ही कारवाई ताजी असतानाच माजी नगरसेवक अरविंद होंडे यांच्यासह चार जणांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
यातच शनिवारी आणखी १७ जणांनी भाजप सोडण्याची तयारी दर्शविल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ‘नंबर एक’ पक्षातच अंतर्गत धुसफूस अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राजीनामा देणाऱ्यांपैकी बहुतांश जण शिंदेसेनेची वाट धरतील, असे चित्र आहे.
ठाण्यात भाजपने शिंदेसेनेत फूट पाडल्याचा आरोप यापूर्वी झाला होता. त्याचीच ‘उलट प्रतिक्रिया’ बुलढाण्यात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपशी निष्ठा असूनही गटांतर्गत राजकारणामुळे शिंदेसेनेजवळ जावे लागत असल्याची भावना काही माजी नगरसेवकांनी उघडपणे व्यक्त केल्याचे समजते.
२०१९ मधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला लक्ष्य केले जात असल्याची खंतही काही नेत्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, पालिका निवडणुकीदरम्यान अर्थकारणाच्या जोरावर विद्यमान शिंदेसेनेच्या आमदारांनी भाजपचे लोक फोडल्याचा आरोप होत आहे. यावरूनच ‘प्रामाणिक काम केले असते, तर पक्ष सोडण्याची गरजच काय?’ असा प्रतिप्रश्न भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षांच्या गटाकडून उपस्थित केला जात आहे.
ज्येष्ठ नेते आमदार चैनसुख संचेती, कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर तसेच चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांच्याकडे काही जबाबदाऱ्या सोपवूनही भाजपला अपेक्षित यश का मिळाले नाही, याची जबाबदारी अद्याप निश्चित झालेली नाही. या प्रश्नावरूनच भाजपमधील अंतर्गत दरी अधिक रुंदावत असल्याचे जाणकारांचे मत आहे. यासंदर्भात आमदार डॉ. संजय कुटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
भाजपमध्ये माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे आणि शिंदेसेनेतून वंचितमार्गे भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले माजी आमदार विजयराज शिंदे, असे स्पष्ट दोन गट पडले आहेत. शिंदेसेनेतून आलेल्यांना ‘उपरे’ अशी उपमा दिली जात असतानाच, निष्ठावान म्हणवणाऱ्या कुटे गटातीलच काही नेत्यांच्या भविष्यातील पदांच्या महत्त्वाकांक्षा चर्चेचा विषय ठरत आहेत.
Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,
पालिका निवडणुकीत हमखास विजयी होऊ शकणाऱ्या जागांवरच ठरावीक गटाने दावा केल्यामुळे भाजपचे जिल्ह्यातील राजकीय गणित फसल्याचेही बोलले जात आहे. त्यातूनच बुलढाण्यात भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला असून, त्याचे पडसाद येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीतही उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.








