Bmc elections : किरीट सोमय्यांच्या मुलाच्या बिनविरोध विजयाला ठाकरेंचा ब्रेक !

Sanjay Raut political move direct flight held in Ward 107 of Mulund : संजय राऊतांची राजकीय चाल, मुलुंडच्या वॉर्ड १०७ मध्ये रंगणार थेट लढत

Mumbai : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमधील वॉर्ड क्रमांक १०७ मध्ये राजकीय नाट्य घडले असून भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या बिनविरोध विजयाच्या शक्यतेला शिवसेना ठाकरे गटाने जोरदार ब्रेक लावला आहे. ठाकरे गटाने नील सोमय्या यांच्या विरोधात दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवल्याने आता या प्रभागातील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नील सोमय्या हे भाजपकडून मुलुंडच्या वॉर्ड १०७ मधून निवडणूक लढवत आहेत. या प्रभागात शिवसेना ठाकरे गटाने सुरुवातीला थेट उमेदवार न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. ही जागा महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे होती. मात्र त्यांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर नील सोमय्यांचा विजय जवळपास बिनविरोध होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आता ठाकरे गटाने घेतलेल्या निर्णयामुळे ही गणिते बदलली आहेत.

Rajya Sabha Election 2026: शरद पवारांसह महाराष्ट्रातील सात खासदार निवृत्त होणार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देत भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर तीव्र टीका केली. किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे शत्रू असून त्यांच्या भूमिका सातत्याने महाराष्ट्रविरोधी राहिल्या आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. मराठी सक्तीच्या शालेय शिक्षणालाही त्यांनी विरोध केला होता आणि त्यासाठी ते न्यायालयात गेले होते, असेही राऊत यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील मराठी उद्योजक आणि मराठी राजकारण्यांविरोधात त्यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून मोहिमा राबवल्याचा आरोपही त्यांनी केला.

संजय राऊत यांनी सांगितले की, वॉर्ड १०७ बाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आग्रह होता. ही जागा अत्यंत नाजूक असल्याने सर्व पक्षांनी मिळून ती जिंकावी, असे आम्ही सुचवले होते. मात्र शेवटी नाईलाजाने ती जागा राष्ट्रवादीला देण्यात आली. त्यानंतर बिनविरोध प्रक्रियेत कथित घोटाळा झाला आणि मुलुंडमध्ये नील सोमय्या बिनविरोध निवडून येणार असल्याचा प्रचार सुरू झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कडवट कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी अर्ज भरला होता आणि तो अद्याप कायम आहे.

यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अधिकृत पत्र देत दिनेश जाधव यांना ठाकरे गटाचा पुरस्कृत उमेदवार घोषित केले आहे. त्यामुळे आता मुलुंडच्या वॉर्ड १०७ मध्ये नील सोमय्या विरुद्ध दिनेश जाधव अशी थेट लढत होणार आहे. जाधव यांना मशाल हे पक्षचिन्ह मिळालेले नसले तरी दूरदर्शन संच या चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. मात्र नील सोमय्या यांना आता बिनविरोध विजय मिळणार नाही आणि त्यांना संघर्ष करावाच लागेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

याचवेळी संजय राऊत यांनी कल्याण-डोंबिवली आणि इतर महापालिकांमधील उमेदवारी माघारीवरही गंभीर आरोप केले. ज्या पद्धतीने आमदार फुटले, त्याच पद्धतीने निवडणुकीत माघारी घेतल्या गेल्याचा आरोप करत त्यांनी खोके, पेट्या आणि पैशांच्या व्यवहारांचा उल्लेख केला. मात्र हे प्रकरण इतक्यावर थांबणार नाही आणि निवडणुका होणारच, असा इशाराही त्यांनी दिला.

Solapur Crime: सोलापूरची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनसेच्या उमेदवाराचा मर्डर,

मुलुंडच्या वॉर्ड १०७ मधील या घडामोडींमुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, सोमय्या पिता-पुत्रांविरोधात ठाकरे गटाने उघडलेला हा मोर्चा आगामी निवडणूक प्रचारात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.