Shweta Mahale : ‘चूक खपवून घेतली जाणार नाही’, शुभारंभालाच आमदारांचा इशारा

MLA warns of corruption-free governance : चिखली नगरपालिकेत ‘महायुती’चे पर्व सुरू; भ्रष्टाचारमुक्त कारभाराचा आमदारांचा इशारा

Chikhli स्थानिक नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षपदी पंडितराव देशमुख यांनी नुकताच अधिकृत पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने चिखलीच्या राजकारणात सत्ताधारी गटाने आपली पकड मजबूत केल्याचे चित्र दिसून आले. मात्र, याच सोहळ्यात आमदार श्वेता महाले यांनी प्रशासकीय पारदर्शकतेवर बोट ठेवत, “कोणतीही चूक खपवून घेतली जाणार नाही,” असा कडक इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पदग्रहण सोहळ्यात बोलताना आमदार महाले यांनी स्पष्ट केले की, नगरपालिका, आमदार आणि राज्य सरकार एकाच विचारधारेचे असल्याने शहरासाठी विकास निधीची कमतरता भासणार नाही. मात्र, हा निधी खर्च करताना कामाचा दर्जा आणि पारदर्शकता पाळणे अनिवार्य असेल. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवणार असल्याचे सांगत, त्यांनी स्वपक्षीय नगरसेवकांनाही अप्रत्यक्षपणे शिस्तीचा इशारा दिला आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या विधानसभेतील गावाने केली कमाल !

यावेळी शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने, भूमिगत गटार योजना आणि शहर स्वच्छतेचे नियोजन, पाणीपुरवठा योजनेच्या कामातील दिरंगाई दूर करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रलंबित प्रश्न आदींचा समावेश होता. निवडणूक काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगरपरिषदेने तातडीने ठराव मंजूर करावेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

India-Bangladesh relations : बांगलादेशला भारतात विलीन करण्याची मागणी !

पंडितराव देशमुख यांच्या पदग्रहणामुळे भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याला केवळ राजकीय पदाधिकारीच नव्हे, तर विविध समाजांचे प्रतिनिधी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठी उपस्थिती होती. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी सर्वांना सोबत घेऊन शहराचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, आता प्रत्यक्ष कामकाजात ते किती यशस्वी ठरतात, याकडे चिखलीकरांचे लक्ष लागले आहे. नगरपालिकेच्या नव्या कार्यकाळात सत्ताधारी गट आणि प्रशासन यांच्यात कसा समन्वय राहतो आणि आमदारांनी दिलेल्या इशाऱ्याचा कामकाजावर काय परिणाम होतो, हे येणारा काळच ठरवेल.