Ravindra Chavhan : विलासराव देशमुखांच्या ‘अपमाना’वरून देऊळगाव राजात रणकंदन

Uproar in Deulgaon Raja over the ‘insult’ to Vilasrao Deshmukh : काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक, भाजपविरोधात घोषणाबाजी

Deulgao raja भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचे पडसाद आता स्थानिक राजकारणात उमटू लागले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी देऊळगाव राजा तालुका काँग्रेस कमिटीने बसस्थानक चौकात जोरदार आंदोलन केले. विशेष म्हणजे, या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसनेही सहभाग नोंदवल्याने भाजपविरोधात महाविकास आघाडीची एकजूट पाहायला मिळाली.

लातूर येथील मेळाव्यातील चव्हाणांच्या विधानाचा समाचार घेताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपवर तिखट टीका केली. “विलासराव देशमुख हे राज्याचे सर्वसमावेशक नेतृत्व होते, त्यांचा अवमान महाराष्ट्र सहन करणार नाही,” असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. बसस्थानक चौकात झालेल्या या निदर्शनांमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, तर कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

Eknath Shinde : खामगावात भाजपला धक्का; हिंदुत्ववादी नेता शिवसेनेत

या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेससोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही सक्रिय सहभाग घेतला. राजकीय वातावरण विषारी करण्यासाठीच भाजप नेत्यांकडून अशी विधाने केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकनेत्यांच्या प्रतिमेवरून सुरू झालेला हा वाद ग्रामीण भागात अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

या निषेध सभेत काँग्रेस नेते रमेश कायंदे, राष्ट्रवादीचे गंगाधर जाधव, गणेश सवडे, तालुकाध्यक्ष रामदास डोईफोडे, राजेश इंगळे, शहराध्यक्ष अतिश कासारे, अभिनव खांडेभराड यांच्यासह विष्णू रामाने, हरीभाऊ शेटे, प्रकाश राजे, विश्वास झिने व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.