व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण विरोधकांकडे मुद्देच उरले नाहीत; त्यामुळे राजकीय षडयंत्रांचा मार्ग – महायुती नेत्यांचा आरोप

विरोधकांकडे मुद्देच उरले नाहीत; त्यामुळे राजकीय षडयंत्रांचा मार्ग – महायुती नेत्यांचा आरोप

महिला आणि युवकांची दिशाभूल करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्नाचा आरोप

Gadchiroli : राज्यातील राजकीय पातळीवर विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासाठी ठोस मुद्दे शिल्लक राहिले नसल्याने ते आता राजकीय षडयंत्रांचा आधार घेत असल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. महिला आणि युवकांची दिशाभूल करून त्यांना भडकविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत, अशा कथित संविधानविरोधी कृत्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीच्या वतीने पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती नेत्यांनी दिली.

गडचिरोली येथे भाजपसह महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विरोधकांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका केली. राज्यातील राजकीय परिस्थितीचा उल्लेख करत विरोधकांकडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

यावेळी माजी खासदार अशोक नेते, डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, गोविंद सारडा, प्रकाश गेडाम तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर आदी उपस्थित होते.

साडेचार वर्षांपासून निवडणुकीचा मुहूर्त हुकला! जिल्हा परिषद इच्छुकांच्या आशा-अपेक्षा अधांतरी!

महायुतीच्या वतीने २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेली पदयात्रा ठाण्यासह राज्यातील विविध भागांतून पुढे सरकत आहे. या पदयात्रेचा ५ नोव्हेंबर रोजी नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून, त्यांची जाहीर सभाही आयोजित करण्यात आली आहे.

आमदार परिणय फुकेंनी काँग्रेसला आठवण करून दिली, म्हणाले…

या सभेच्या माध्यमातून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या कथित राजकीय षडयंत्रांचा आणि अराजकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा पर्दाफाश केला जाईल, असा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला. दरम्यान, नागपुरातील पदयात्रा आणि समारोप सभेसाठी गडचिरोली जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महायुती जिल्ह्यातील आपली संघटनात्मक ताकद दाखविण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय चित्र दिसत आहे.

error: Content is protected !!