व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र BMC Election : मुंबई महाराष्ट्राचीच; ‘बॉम्बे आंतरराष्ट्रीय शहर’ वक्तव्यावर नव्या संघर्षाची ठिणगी

BMC Election : मुंबई महाराष्ट्राचीच; ‘बॉम्बे आंतरराष्ट्रीय शहर’ वक्तव्यावर नव्या संघर्षाची ठिणगी

Strong reaction from various parties, Sanjay Rauts attack on K. Annamalai : विविध पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया, संजय राऊतांचा के. अण्णामलाईंवर घणाघात

Mumbai : एकीकडे ‘मुंबई मराठी माणसाची की कोणाची?’ या प्रश्नावरून राज्यातील राजकारण तापलेले असतानाच, या वादात आता भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या वक्तव्यामुळे नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा करत हे शहर महाराष्ट्राचे नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे वक्तव्य अण्णामलाई यांनी केल्यानंतर राज्यातील विविध पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अण्णामलाई यांच्यावर जोरदार शब्दांत टीका करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

के. अण्णामलाई हे तामिळनाडूतून मुंबईत प्रचारासाठी आले असताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठी अस्मिता आणि मुंबईच्या ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अण्णामलाई यांनी “मोदीजी केंद्रात आहेत, देवेंद्रजी राज्यात आहेत आणि बॉम्बेमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे,” असे विधान केले होते. मुंबईचे बजेट 75 हजार कोटी रुपयांचे असल्याचा उल्लेख करत त्यांनी चेन्नई आणि बंगळुरूच्या बजेटशी तुलना केली आणि मुंबईसाठी सक्षम प्रशासनाची गरज असल्याचे मत मांडले होते.

PMC Election : गुन्हेगारी संपवायची भाषा आणि गुन्हेगारांना उमेदवारी ही विसंगती

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत अण्णामलाई यांचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना इथे येण्याचा अधिकार काय, असा संतप्त सवाल करत त्यांनी अण्णामलाई यांच्यावर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेना ठाकरे गटही या वादात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना अण्णामलाई यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी संताप व्यक्त केला. अण्णामलाई कोण आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपने आमच्यावर फेकलेले हे मुंगळे असल्याचा शब्दप्रयोग केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.

Sudhir Mungantiwar : आ. सुधीर मुनगंटीवार यांची बैलबंडीवर मिरवणूक आणि लाडू तुला

दरम्यान, रविवारी शिवाजी पार्क येथे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त जाहीर सभा पार पडली होती. या सभेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ठाकरेंना सतत सभा घेण्याची गरज नाही, कालची सभा परिवर्तन घडवणारी होती. राज ठाकरे यांनी सादर केलेले प्रेझेंटेशन यापूर्वी कोणीच केले नसल्याचे सांगत त्यांनी उद्योगपती आणि विकासाच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. शिवसेना नेहमी उद्योगपतींच्या पाठीशी उभी राहिली कारण त्यामुळे रोजगार आणि राज्याची आर्थिक स्थिती मजबूत होते, असे राऊत म्हणाले. मात्र, मुंबईसारख्या शहरातून विमानतळ बाहेर काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.

के. अण्णामलाई यांच्या वक्तव्यामुळे सुरू झालेला हा वाद केवळ शब्दांच्या पातळीवर न राहता मुंबईच्या ओळखीचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा बनत चालला असून, येत्या काळात या विषयावर राजकीय तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

___

error: Content is protected !!