Raveena Tandon campaigns for the Thackeray brothers : महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता टिकवणार्यांना साथ देत असल्याचा दावा
Mumbai बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या प्रचाराचा पारा आता शिगेला पोहोचला आहे. मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी मुंबईत राजकीय ग्लॅमर पाहायला मिळाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रचारासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन प्रत्यक्ष मैदानात उतरली असून, तिने आयोजित केलेल्या रोडशोमुळे शिवसैनिकांमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले आहे. “महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता टिकवण्यासाठी जे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत, त्यांना साथ देणे हे माझे कर्तव्य आहे,” अशा शब्दांत रवीनाने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली आहे.
रविवारी सकाळपासूनच मुंबईत राजकीय पक्षांच्या रॅली आणि पदयात्रांचे पेव फुटले होते, मात्र रवीना टंडनच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रोडशो दरम्यान रवीनाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. यावेळी तिने केवळ ग्लॅमर म्हणून उपस्थिती न लावता, कोविड काळातील महापालिकेच्या प्रशासकीय कामगिरीचे विशेष कौतुक केले. नागरी समस्या, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर मतदारांनी गांभीर्याने विचार करूनच कौल द्यावा, असे आवाहन तिने यावेळी केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई मॉडेलचे तिने यावेळी समर्थन केल्याचे दिसून आले.
BMC Election : मुंबई महाराष्ट्राचीच; ‘बॉम्बे आंतरराष्ट्रीय शहर’ वक्तव्यावर नव्या संघर्षाची ठिणगी
या निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी युती केल्याने आधीच राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच रवीना टंडनसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटीने प्रचारात उडी घेतल्याने ठाकरे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोठ्या फॅन बेसचा वापर करून मतदारांपर्यंत थेट संदेश पोहोचवण्याची उद्धव ठाकरे यांची ही ‘ग्लॅमरस खेळी’ यशस्वी होताना दिसत आहे. पारंपारिक प्रचार पद्धतींसोबतच अशा लोकप्रिय चेहऱ्यांचा वापर केल्याने तरुण मतदारांना आकर्षित करणे पक्षाला सोपे जात आहे.
PMC Election : गुन्हेगारी संपवायची भाषा आणि गुन्हेगारांना उमेदवारी ही विसंगती
ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक एकत्र येण्यानंतर आता बॉलिवूडमधूनही मिळणारा हा पाठिंबा महायुतीसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. रवीनाच्या या प्रचार मोहिमेचा प्रभाव मुंबईतील कोणत्या प्रभागांमध्ये किती पडतो, हे १५ जानेवारीच्या मतदानानंतर आणि निकालातून स्पष्ट होईल. मात्र, सध्यातरी मुंबईच्या राजकीय वातावरणात राजकीय चर्चांसोबतच रवीना टंडनच्या रोडशोचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.








