Bogus lease allocation : सुभाष कासनगोट्टूवारांना तात्काळ अटक करा!

Serious allegations of bogus land distribution using fake stamps,attack by MP Pratibha Dhanorkar : बनावट शिक्क्यांनी बोगस पट्टे वाटपाचा गंभीर आरोप, खा. प्रतिभा धानोरकर यांचा थेट हल्लाबोल

Chandrapur : चंद्रपूर शहरात निवडणुकीच्या तोंडावर उघडकीस आलेल्या बोगस पट्टे वाटप प्रकरणाने राजकीय वातावरण प्रचंड तापले असून भाजपचे निलंबित शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर तात्काळ अटक करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जोरदार मागणी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. सरकारी यंत्रणेचे बनावट शिक्के वापरून गरिबांची उघड फसवणूक करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालता येणार नाही, असा ठाम इशारा त्यांनी दिला आहे.

चंद्रपूर शहरातील राजू नगर परिसरात सुभाष कासनगोट्टूवार यांनी सरकारी शिक्के असल्याचा आभास निर्माण करणारे बनावट दस्तऐवज वापरून तथाकथित पट्टे वाटप केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार केवळ निवडणूक आचारसंहितेचा भंग नाही, तर शासकीय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर घाला घालणारा गंभीर गुन्हा असल्याचे खा. धानोरकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी त्यांनी थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करून कासनगोट्टूवार यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

Akola Municipal Election : आपसातील हेवेदावे, नेत्यांनी फिरवली पाठ, भाजपेत्तर पक्षांचे देव पाण्यात

या प्रकरणाची दखल घेत खा. धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सुभाष कासनगोट्टूवार यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. यावेळी माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, सुभाष गौर आणि प्रशांत भारती उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता चंद्रपूर महानगरपालिकेने स्वतः पुढाकार घेत चौकशी केली असता, संबंधित पट्ट्यांवरील सर्व शिक्के प्रशासकीयदृष्ट्या अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महानगरपालिकेच्या उपायुक्तांनी १२ जानेवारी २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याला पाठविलेल्या पत्रात हे सर्व शिक्के बनावट असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. नगर रचना विभागामार्फत असे कोणतेही शिक्के तयार करण्यात आलेले नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

Prataprao Jadhav : केंद्रात भाजपसोबत सत्तेत; महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे आवाहन

आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू असताना मतदारांना प्रलोभन देण्यासाठी सरकारी मोहोर आणि पदाचा गैरवापर करून बोगस पट्टे वाटणे हा अत्यंत गंभीर प्रकार असून तो थेट लोकशाही प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेनुसार हा प्रकार फसवणूक, बनावट कागदपत्रांची निर्मिती आणि शासकीय यंत्रणेची बदनामी या गंभीर गुन्ह्यांच्या चौकटीत येतो, असे धानोरकर यांनी ठामपणे सांगितले.

या प्रकरणाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर, विशेषतः व्हॉट्स ग्रुप्सवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, हेच या कथित गुन्ह्याचे ठोस पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे. राजकीय फायद्यासाठी सामान्य, गरिब जनतेची फसवणूक करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच आळा घालला नाही, तर भविष्यात याचे परिणाम गंभीर असतील, असा इशाराही धानोरकर यांनी दिला.

Nitesh Rane : महापौर ‘आय लव्ह महादेव’ म्हणणारा असावा

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सुभाष कासनगोट्टूवार तसेच त्यांना मदत करणाऱ्या सर्व संबंधितांविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंग आणि फसवणुकीचे गुन्हे तात्काळ दाखल करावेत, अशी स्पष्ट मागणी खा. धानोरकर यांनी केली आहे. दरम्यान, चंद्रपूर महानगरपालिकेने पुढील कायदेशीर कारवाईसाठी सहायक नगर रचनाकार प्रतीक देवतळे यांची नियुक्ती केली असून पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आता अटक आणि कठोर कारवाई होते की नाही, याकडे संपूर्ण चंद्रपूरचे लक्ष लागले आहे.

___