Prataprao Jadhav : सत्तेसाठी वेगळे, सत्तेसाठीच एकत्र, पण जनतेने नाकारले

Indirect swipe at the Thackeray brothers by Union minister : केंद्रीय मंत्र्याचा ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

Chikhali सत्तेसाठी वेगळे झालेले दोन भाऊ आणि पुन्हा सत्तेच्याच गणितासाठी एकत्र आलेले राजकारण जनतेने नाकारले आहे, असा जोरदार टोला केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना लगावला. मुंबई महापालिकेच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी ही टीका केली. याचवेळी चिखली तालुक्यात तसेच जिल्हा परिषदेतही महायुतीचाच भगवा फडकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चिखली नगरपालिकेत भाजप–शिंदेसेना महायुतीच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष वैशाली कपिल खेडेकर यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख होते. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, अंकुशराव पडघान, सुरेशआप्पा खबुतरे, माया म्हस्के, भास्करराव मोरे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

Election Commission : एका महिन्यात खर्च सादर करा, अन्यथा कारवाई!

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, “शिवसेना–भाजप युती ही १९९० पासूनची असून तिचे आपण सर्व साक्षीदार आहोत. या युतीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुका लढलो आणि विजय मिळवला. मुंबई महापालिकेवरही युतीचाच भगवा फडकला असून, हाच युतीधर्म पाळत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका लढविण्यात येतील.”

पालिका निवडणूक संपली असून, आता निवडणुकीतील मतभेद विसरून महायुतीचा घटक म्हणून एकदिलाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार असून, खासदार म्हणून आपणही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सत्काराला उत्तर देताना उपाध्यक्ष वैशाली खेडेकर यांनी सांगितले की, जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. नगरपालिकेचे कामकाज लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान राहील, यासाठी आपण प्रयत्नशील राहू.

नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांच्या समस्या सोडवून राजधर्म निभावण्याची ग्वाही दिली. आमदार श्वेता महाले या विकासकन्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Thane politics : निकाल लागताच भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, ठाण्यात राजकीय भूकंप

मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की, “मराठी मुद्दा आणि विविध अपप्रचारांचा आधार घेत दोन भाऊ एकत्र आले; मात्र जनतेने त्यांना कधी वेगळे केले नव्हते, ना एकत्र आणले. ते सत्तेसाठीच वेगळे झाले आणि पुन्हा सत्तेच्याच लालसेपोटी एकत्र आले. मुंबईकरांनी त्यांचे राजकारण ओळखून त्यांना योग्य उत्तर दिले आहे.” या वक्तव्यामुळे चिखलीतील राजकीय वातावरण तापले असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून आक्रमक सूर पकडल्याचे स्पष्ट झाले आहे.