Nitin Nabin : नितीन नबीन यांची केरळसाठी मोठी खेळी

Responsibility of conquering of Mission South lies with Marathi leader : मिशन साऊथचा किल्ला जिंकण्याची जबाबदारी मराठी नेत्याकडे

New Delhi : भाजपने ‘मिशन साऊथ’ अंतर्गत दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आपली पाळेमुळे अधिक भक्कम करण्याचा निर्धार केला असून तामिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांवर पक्षाच्या नेतृत्वाची विशेष नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासाठी ही राज्ये अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, याच पार्श्वभूमीवर भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पदभार स्वीकारताच आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, असम, पुदुचेरी आणि केरळ या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका भाजपसाठी मोठे आव्हान ठरणार आहेत. या पैकी एकही राज्य भाजपसाठी सोपे नसल्याचे वास्तव असताना, सर्वात कठीण लढत केरळमध्ये होणार असल्याचे स्पष्ट मानले जात आहे. केरळमध्ये भाजपला आजवर सत्ता स्थानापर्यंत पोहोचता आलेले नाही आणि याच ‘किल्ल्या’ला भेदण्याची जबाबदारी नितीन नबीन यांनी थेट महाराष्ट्रातील अनुभवी नेते विनोद तावडे यांच्यावर सोपवली आहे.

Akola Municipal Corporation : शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपला साथ देणार?

संघटनात्मक बांधणीतील कुशल रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या विनोद तावडे यांना केरळ विधानसभा निवडणुकीचे प्रभारी नियुक्त करण्यात आले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या यशात तावडेंनी बजावलेली भूमिका लक्षात घेता, केरळमध्येही त्यांच्याकडून तसाच चमत्कार घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्यासोबत कर्नाटकातील नेत्या शोभा करंदलाजे यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे केरळसाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, इतर राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही भाजपने अनुभवी नेत्यांची नेमणूक केली आहे. तेलंगणातील नगर परिषद निवडणुकांची जबाबदारी आशिष शेलार यांच्यावर सोपवण्यात आली असून, अशोक परनामी आणि रेशा शर्मा यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रेट बंगळुरू महापालिका निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते राम माधव यांना प्रभारी करण्यात आले असून, सतीश पुनिया आणि संजय उपाध्याय यांच्यावर सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

केरळचा राजकीय पट पाहता ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांचा निर्णायक प्रभाव असून, यूडीएफ आणि एलडीएफ या दोन आघाड्यांभोवतीच राज्यातील सत्ता फिरत आली आहे. या दोन्ही आघाड्यांमुळे भाजपसाठी सत्ता मिळवणे आजवर अत्यंत कठीण ठरले आहे. मात्र भाजपचा केरळमधील मतांचा टक्का सातत्याने वाढताना दिसत आहे. 2014 मध्ये भाजपला केरळमध्ये 14 टक्के मते मिळाली होती, 2019 मध्ये ती वाढून 16 टक्क्यांवर गेली आणि 2024 मध्ये हा आकडा थेट 20 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

BMC Power Tussle : मुंबईच्या महापौरपदावरून भाजप–शिवसेनेत तणाव; सत्तेसाठी ‘नाशिक’ पॅटर्नची चर्चा!

राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपला केरळमध्ये सत्ता मिळवायची असेल तर किमान 30 टक्क्यांहून अधिक मते मिळवणे आवश्यक आहे. 20 ते 30 आणि पुढे 30 ते 40 टक्क्यांपर्यंत मजल मारणे हेच भाजपसमोरचे खरे आव्हान आहे. अशा परिस्थितीत केरळचा किल्ला जिंकण्याची सर्वात अवघड जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर टाकण्यात आली असून, नितीन नबीन यांच्या नेतृत्वातील ही रणनीती भाजपला दक्षिणेत निर्णायक यश मिळवून देणार की आणखी एक कठीण संघर्ष ठरणार, याकडे संपूर्ण देशाचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.