Mayoral election : छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात?

Reservation for open category announced intense lobbying in BJP 12 contenders in fray : खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच भाजपमध्ये जोरदार लॉबिंग, १२ दावेदार रिंगणात

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदावरून सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत मुंबईत जाहीर होताच छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली असून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एकूण ११५ नगरसेवक आहेत. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत ५७ हून अधिक नगरसेवक निवडून आणले असून बहुमतापासून अवघे एक मत दूर आहे. त्यामुळे यंदा शहराला भाजपचाच महापौर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने भाजपमधील अनेक नगरसेवकांनी या पदासाठी तयारी सुरू केली असून सध्या पक्षात १२ दावेदारांची नावे चर्चेत आहेत.

Raj Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची काळजाला भिडणारी पोस्ट

दहा वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. आतापर्यंत शिवसेना-भाजप युतीचाच महापौरपदावर वरचष्मा राहिला आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकांत एमआयएम हा सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला होता. मागील निवडणुकीत एमआयएमने २५ जागा मिळवत लक्ष वेधले होते, तर यंदा ३३ जागा जिंकून शिवसेनेलाही पिछाडीवर टाकली आहे. असे असले तरी यावेळी भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्याने महापौरपद भाजपकडे जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

मुंबईत आरक्षणाची सोडत जाहीर होताच छत्रपती संभाजीनगरमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी झाल्याचे दिसून आले. भाजपकडून महापौरपदासाठी राजू वैद्य, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, सविता कुलकर्णी, माधुरी अदवंत, महेश माळवतकर, विजय औताडे, अप्पासाहेब हिवाळे, शिवाजी दांडगे, राज वानखेडे, रामेश्वर भादवे आणि अनिल मकरिये या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यापैकी नेमकं कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

या सर्व इच्छुक नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या प्रक्रियेनंतर अंतिम दावेदारांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबईहून येणाऱ्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगरचा २३ वा महापौर कोण होणार, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Narendra Modi : महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा मिळते

दरम्यान, मराठवाड्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये विविध प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्येही महिलेला महापौरपदाची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे. भाजपकडून दोन महिला नगरसेविकांची नावे यादीत पाठवली जाण्याची शक्यता असून त्यापैकी एखाद्या नावावर अंतिम निर्णय होतो का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शहराच्या कोणत्या भागातून महापौर निवडला जाणार, याबाबतही उत्सुकता वाढली आहे.