Maharashtra politics : निर्णय राष्ट्रवादीचा, पण आधी आमच्याशी चर्चा आवश्यक

Chief Minister Devendra Fadnavis clear comment on NCP merger : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट भाष्य

Mumbai : दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. खासदार शरद पवार आणि आमदार जयंत पाटील यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार होते, असा दावा केल्यानंतर या विषयाला अधिकच उधाण आले. या दाव्याच्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे येत या संपूर्ण प्रकरणावर महत्त्वाचे आणि ठोस भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 फेब्रुवारी रोजी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत प्रतिक्रिया दिली. शरद पवार गटाकडून करण्यात येत असलेल्या दाव्यांवर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित करताना फडणवीस म्हणाले की, अजित पवार आणि आमच्यात नेहमीच सविस्तर चर्चा होत असत. जर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत कोणतीही ठोस चर्चा सुरू असती, तर अजितदादांनी त्याची माहिती आम्हाला दिली असती. त्यांनी असेही स्पष्ट केले की अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र पक्ष असून त्या पक्षाचे निर्णय त्यांच्याच नेतृत्वाखाली घेतले जात होते.

Budget 2026: कपडे, चपलापासून औषधांपर्यंत दिलासा;

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनिल तटकरे यांनी बारामती येथे झालेली बैठक ही केवळ जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवण्याबाबत होती, असे सांगत शरद पवार यांच्या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. असे असतानाही विलीनीकरणाच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण होणार असेल तर त्याबाबत आधी आम्हाला सांगितले गेले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. भविष्यात विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार असल्यास, त्याआधी भाजपाशी चर्चा करणे आवश्यक असल्याची अटही त्यांनी समोर ठेवली. निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रवादीचा असला तरी सत्तेतील घटक पक्ष म्हणून आम्हाला विश्वासात घेतले पाहिजे, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार करता अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत सत्तेत आहे, तर शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष विरोधी बाकावर आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या शक्यतेमुळे सत्तासमीकरणांवर परिणाम होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत शरद पवार गटाला सत्तेत सहभागी व्हावे लागेल किंवा अजित पवार गटाला सत्तेतून बाहेर पडावे लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शनिवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या, असा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्याची वेळ राजकारण करण्याची नाही. जर अजित पवार अशा कोणत्याही प्रकारच्या एकत्रीकरणाची चर्चा करत असते, तर ती चर्चा भाजपाशी केल्याशिवाय होणे शक्य नाही. तसेच सरकारमधून बाहेर पडण्याच्या कोणत्याही चर्चा सुरू होत्या, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर नाराजी व्यक्त केली.

Sudhir mungantiwar : केंद्रीय अर्थसंकल्पातून विकसित भारताची स्पष्ट दिशा

अजित पवार हे आपल्याशी सर्व गोष्टी शेअर करत असत, आणि त्यांच्या निधनापूर्वीही आपली चर्चा झाली होती, असे सूचक विधान करत फडणवीस यांनी खालच्या पातळीचे राजकारण टाळण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत पुढे नेमके काय घडते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.