
Dr-zeeshan-hussain-is-new-congress-group-leader : महानगराध्यक्षांना अधिकृत पत्र; अंतर्गत विरोधानंतरही हर्षवर्धन सपकाळ यांचा हुसेन यांच्यावर विश्वास
Akola अकोला महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नेतृत्वाचा पेच अखेर सुटला असून, गटनेतेपदी डॉ. झिशान हुसेन यांच्या नावावर प्रदेश काँग्रेसने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी डॉ. हुसेन यांच्या निवडीला हिरवा कंदील दाखवत तसे पत्र महानगर काँग्रेसला धाडले आहे. या निवडीमुळे महापालिकेतील आगामी विरोधी पक्षनेतेपदाचा मार्गही डॉ. हुसेन यांच्यासाठी सुकर झाला असून, भाजपने सत्ता काबीज केल्यानंतर आता काँग्रेसकडून प्रबळ विरोधकाची भूमिका पार पाडली जाणार आहे.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसने २१ जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. मात्र, गटनेतेपदावरून पक्षात दोन गट पडले होते. डॉ. झिशान हुसेन यांच्या नावाला काही नगरसेवकांनी विरोध दर्शवल्याने हे प्रकरण प्रदेश स्तरावर पोहोचले होते. महानगराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखेडे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्व बाबींचा विचार करून अनुभवी नेतृत्व म्हणून डॉ. हुसेन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे पक्षांतर्गत वादावर आता पडदा पडला आहे.
Maharashtra State Seeds Corporation : ‘महाबीज’ संचालकपदाची निवडणूक सलग दुसऱ्यांदा अवरोधित
निवडीची अधिकृत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काँग्रेसचे सर्व २१ नगरसेवक अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जाणार आहेत. तिथे कायदेशीररित्या ‘काँग्रेस गट’ म्हणून नोंदणी केली जाईल आणि डॉ. झिशान हुसेन यांच्या नावाची गटनेते म्हणून अधिकृत घोषणा होईल.
भाजपने अकोला महापालिकेत ३८ जागा जिंकत आणि ‘शहर सुधार आघाडी’च्या माध्यमातून ४४ नगरसेवकांचे संख्याबळ जमवून सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेस हा महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष असल्याने विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडेच राहणार आहे. डॉ. झिशान हुसेन यांनी यापूर्वीही विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावी कामगिरी केली आहे. आक्रमक वक्ता आणि महापालिका कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या हुसेन यांच्याकडे ही जबाबदारी सोपवून काँग्रेस सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखत आहे.








