व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण नागपूर नामांतरण वादात काँग्रेसची उडी; राऊतांच्या ‘दीक्षाभूमी’ मागणीला विजय वडेट्टीवारांचा पाठिंबा

नागपूर नामांतरण वादात काँग्रेसची उडी; राऊतांच्या ‘दीक्षाभूमी’ मागणीला विजय वडेट्टीवारांचा पाठिंबा

नागपूरच्या नामांतर प्रस्तावावरून राजकारण पेटले

Nagpur : मुंबईतील दादर स्थानकाच्या नामांतरणावरून सुरू झालेला राजकीय वाद आता उपराजधानीत अधिकच तीव्र झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी नागपूर शहराचे नाव बदलून ‘दीक्षाभूमी’ करण्याची मागणी केल्यानंतर, आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या मागणीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे नामांतरणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत दादर स्थानकाला ‘चैत्यभूमी’ नाव देण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर विरोधकांनी दादर ही मुंबईची ओळख आहे, असे म्हणत या निर्णयाला विरोध सुरू केला. हा वाद वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादर रेल्वे स्थानकाला नव्हे, तर दादर मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याचे ठरले असल्याचे स्पष्ट केले होते.

नागपूरचे नाव दीक्षाभूमी करा, संजय राऊतांची गुगली

मात्र, त्यानंतरही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका सुरूच असून, संजय राऊत यांनी नागपूरच्या नामांतरणाचा मुद्दा उपस्थित केला.
संजय राऊत यांच्या सूचनेचे समर्थन करताना विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या नामांतरणाला काय हरकत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. आपल्या भूमिकेचे समर्थन करताना वडेट्टीवार म्हणाले की, संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीच्या कार्यामुळे नागपूरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

याच भूमीवर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन समता आणि मानवतेचा संदेश दिला. दीक्षाभूमी हे सामाजिक परिवर्तन आणि संविधानिक मूल्यांचे प्रतीक असल्याने नागपूरला ‘दीक्षाभूमी’ नाव देण्याची राऊत यांची भूमिका योग्य असून काँग्रेसचा याला पाठिंबा आहे. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आणि काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे आता या मुद्यावर भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!