कृषीपंप बंद असल्याने शेतकऱ्यांचा संताप; आमदार निधीतून पैसे देण्याचीही तयारी
Amravati शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्यासाठी ओळखले जाणारे आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा त्यांच्या खास शैलीमुळे चर्चेत आले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असताना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्याला थेट फोन लावून चांगलेच धारेवर धरले. ‘तुम्ही लिहून दिल्यावरही डीबी मिळत नसेल, तर थोबाडात कोणाच्या मारायची?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहे.
अमरावती जिल्ह्यातील सातेगाव येथे पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी कृषीपंपांसाठी आवश्यक असलेली डीबी (डिस्ट्रीब्युशन बॉक्स) उपलब्ध नसल्याची तक्रार बच्चू कडू यांच्याकडे केली. डीबीअभावी कृषीपंप बंद असल्याने शेतकऱ्यांना सिंचन करता येत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. पिकांना पाण्याची गरज असताना वीज वितरण व्यवस्थेतील या अडचणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही साशंकता; विमानतळ भूसंपादनाला विरोध कायम!
शेतकऱ्यांची तक्रार ऐकताच बच्चू कडू यांनी विलंब न करता महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याला फोन लावला. यापूर्वी लेखी सूचना देऊनही डीबी उपलब्ध होत नसेल, तर जबाबदारी कोणाची, असा सवाल त्यांनी केला. ‘साहेब, थोबाडात कोणाच्या मारायची?’ या त्यांच्या थेट प्रश्नामुळे फोनवरील संवादाची चांगलीच चर्चा रंगली.
अधिकाऱ्यांनी डीबी बसविण्यासाठी निधीची अडचण असल्याचे सांगितले. त्यावर कडू यांनी आमदार निधीतून आवश्यक पैसे देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्याचवेळी कामाला होणाऱ्या विलंबावरही त्यांनी बोट ठेवले. महिनाभरानंतर शेतात पीकच शिल्लक राहिले नाही, तर डीबी बसवून काय उपयोग? असा सवाल करत त्यांनी तातडीने काम पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
लोकसभेसाठी अडीच वर्षे आधीच मोर्चेबांधणी संभाव्य उमेदवाराची मतदारसंघात सक्रियता!
शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाकडून होणाऱ्या विलंबावर कडू यांनी व्यक्त केलेला संताप या व्हिडीओतून समोर आला आहे. त्यांच्या आक्रमक संवादाची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू असून, आता महावितरणचे अधिकारी डीबी बसविण्याबाबत किती लवकर कार्यवाही करतात, याकडे सातेगावातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.







