व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Cabinet meeting : मंत्रिमंडळाचा धडाका; एका बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय !

Cabinet meeting : मंत्रिमंडळाचा धडाका; एका बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय !

maharashtra-cabinet-meeting-19-decisions-ajit-pawar-important-approvals : अजित पवारांच्या अखत्यारितील 3 प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी

Mumbai : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आचारसंहिता संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 19 मोठे निर्णय घेण्यात आले असून, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारित प्रस्तावित असलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली आहे. या बैठकीत अजित पवार यांची अनुपस्थिती सर्वांनाच भावनिक करून गेली, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थिती लावली.

बैठकीच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने दिवंगत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे मुख्य सचिवांनी शोकप्रस्ताव वाचला, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख करून देत मंत्रिमंडळात त्यांचे स्वागत केले. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. निवडणुकांनंतरची ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असल्याने तिच्याकडे विशेष लक्ष लागले होते.

Municipal Corporation revenue : छत्रपती संभाजीनगर मनपाचा ‘नगररचना’ विभाग मालामाल; १० महिन्यांत ९८ कोटींचा महसूल गोळा

या बैठकीत अजित पवार यांच्या कार्यकाळात प्रस्तावित आणि त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये बारामती जिल्हा क्रीडा संकुल अंतर्गत मौजे कटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उभारण्यासाठी 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 80 हजार चौरस मीटर क्षेत्रावर पॅव्हेलियन, जलतरण तलाव, स्केटिंग रिंग, आर्चरी रेंज, बास्केटबॉल मैदान आदी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाशी संबंधित विविध विभागांतील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नाबार्डकडून जलसंपदा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली असून, यामुळे 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण होतील आणि 193 प्रकल्पांच्या वितरण प्रणालीत सुधारणा होणार आहे. यामुळे सुमारे 8 लाख हेक्टर कृषी क्षेत्र सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Sunetra Pawar : दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण…; सुनेत्रा पवारांची मंत्रिमंडळ बैठकीत एन्ट्री;

कोल्हापूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी मौजे विकासवाडी, तालुका करवीर येथील 12 हेक्टर 76 आर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठी विशेष हेतू प्राधिकरण स्थापन करण्यास आणि भूसंपादन व इतर कामांसाठी 6 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास शासन हमीसह मान्यता देण्यात आली आहे.

राज्यात ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरापर्यंत आरोग्य सुधारणा घडवून आणण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानासाठी दरवर्षी 80 कोटी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात विलीनीकरणाचा अजेंडा की अर्थसंकल्पाची तयारी?

 

 

 

मुंबई, पुणे, नागपूर, परभणी, अकोला, धाराशिव यांसह विविध जिल्ह्यांतील औद्योगिक, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित निर्णयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातील तिसरी मुंबई प्रकल्प, सार्वजनिक-खासगी भागीदारी धोरण 2026, ई-मेलद्वारे नोटीस बजावण्यास कायदेशीर मान्यता, सुधारित धान्य वितरण प्रणाली, विद्यापीठ व व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित कायद्यात सुधारणा अशा अनेक दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णयांचा समावेश या बैठकीत करण्यात आला आहे.

एकूणच आचारसंहिता संपल्यानंतर झालेल्या या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे आणि अजित पवार यांच्या स्मृतींशी जोडलेले निर्णय घेण्यात आल्याने या बैठकीला राजकीय आणि प्रशासकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

__

error: Content is protected !!