buldhana-farmer-suicide-mera-budruk-government-loan-waiver-failure : पतीचा मृत्यू, पत्नीशी मृत्यूशी झुंज; मंत्र्यांच्या जिल्ह्याला ‘नापिकी’चा शाप की प्रशासकीय उदासीनता?
Buldhana राज्यात सत्तेसाठी आणि फोडाफोडीच्या राजकारणासाठी दररोज नवनवीन स्क्रिप्ट लिहिल्या जात असताना, विदर्भातील बळीराजा मात्र अद्यापही मृत्यूच्या विळख्यात अडकलेला आहे. महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही कागदावरच असल्याने आणि बँकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळे चिखली तालुक्यातील मेरा बु. येथील एका तरुण शेतकरी दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले. या हृदयद्रावक घटनेत पती संतोष सखाराम दाभाडे (३४) यांचा मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
जिल्ह्यात एकीकडे मंत्र्यांच्या ‘बायोपिक’ची चर्चा रंगत असताना, दुसरीकडे शेतकरी कुटुंबांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दाभाडे कुटुंबाकडे अवघी दोन एकर कोरडवाहू जमीन आहे. घर चालवण्यासाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र (मेरा खुर्द शाखा) कडून एक लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते.
यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे हातातून गेले. कर्ज कसे फेडायचे आणि कुटुंब कसे चालवायचे, या चिंतेने दाभाडे कुटुंबात नैराश्याचे सावट होते. शासनाने कर्जमाफीच्या घोषणा केल्या असल्या तरी बँकांच्या पोर्टलवर अद्याप नावे अपडेट झालेली नाहीत. त्यामुळे बँकांकडून होणाऱ्या वसुलीच्या तगाद्याने संतोष यांनी पत्नीसह विष प्राशन केले.
बुलढाणा जिल्हा हा सध्या राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. केंद्रीय मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी विकासाचे मोठे दावे करत असले तरी, ग्रामीण भागातील आत्महत्यांचे सत्र थांबवण्यात सरकारला अपयश आल्याचे या घटनेने अधोरेखित केले आहे. शेतकरी संघटनांचा असा आरोप आहे की, सरकारी निकषांच्या जाळ्यात अडकल्यामुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदतीचा हात पोहोचत नाहीये.
Khamgaon Mangesh Ingle : दोन पक्ष, दोन पदे… मंगेश इंगळे संचालकपदाचा मोह कधी सोडणार?
निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि सभांसाठी कोट्यवधींचा खर्च करणाऱ्या राजकीय पक्षांकडे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस आराखडा नसल्याची टीका आता ग्रामस्थांमधून होत आहे. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना उघडकीस येताच मेरा बु. परिसरात संतापाची लाट उसळली आहे. गावातील कोतवाल सचिन पडघान आणि ग्रामस्थांनी तातडीने दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु संतोष यांचा जीव वाचवता आला नाही.








