व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करा; शिवसेना संपर्कप्रमुखांचे पालकमंत्र्यांना पत्र

दुष्काळ निवारणासाठी कृती आराखडा तयार करा; शिवसेना संपर्कप्रमुखांचे पालकमंत्र्यांना पत्र

केवळ टँकरवर अवलंबून न राहता पाणी, चारा आणि रोजगाराचे नियोजन करण्याची सूचना

Yavatmal: जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झाले असून, संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार यांनी केली आहे. केवळ टँकर सुरू करून दुष्काळावर मात करता येणार नाही. त्यासाठी पुढील सहा ते आठ महिन्यांचा तालुकानिहाय आणि गावनिहाय कृती आराखडा तयार करावा, अशी सूचना त्यांनी पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील पावसाची अनिश्चितता आणि पिकांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने संकट निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आधीच नियोजन करणे आवश्यक असल्याचे लिंगनवार यांनी पत्रात नमूद केले आहे. या मागणीमुळे दुष्काळ निवारणाच्या तयारीबाबत प्रशासनाची पुढील भूमिका काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीच्या संचालकांची मंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक; शिंदेसेनेच्या भूमिकेकडे लक्ष!

धरणे, तलाव, बंधारे आणि अन्य जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा नियमित आढावा घ्यावा. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच पाण्याचा अनावश्यक उपसा आणि अपव्यय रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुष्काळाचा फटका पशुधनाला बसू नये, यासाठी गावनिहाय जनावरांची संख्या आणि चाऱ्याची उपलब्धता तपासण्याची सूचनाही करण्यात आली आहे. चाऱ्याची टंचाई जाणवू शकणाऱ्या भागांत चारा डेपो, चारा छावण्या आणि जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था आधीच करावी. ज्वारी, गहू, बाजरी आणि मका यांसारख्या पर्यायी चारा स्रोतांची उपलब्धता करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पाणी आणि रोजगाराच्या शोधात ग्रामीण कुटुंबांचे स्थलांतर होण्याची शक्यता लक्षात घेऊन संवेदनशील गावांची आधीच ओळख करावी. स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने विशेष लक्ष द्यावे, असे लिंगनवार यांनी म्हटले आहे.

जिल्हा आणि तालुकास्तरावर दुष्काळ नियंत्रण कक्ष सक्रिय करून पाणी, चारा, रोजगार, आरोग्य आणि शेतीविषयक तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. ग्रामपंचायती, शेतकरी, महिला बचत गट, युवक आणि सामाजिक संस्थांना सहभागी करून ‘पाणी वाचवा, गाव वाचवा’ मोहीम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

भाजपचे टेन्शन कायम, नागपूर पदवीधरसाठी थेट संघाचे दार ठोठावले!

दुष्काळाच्या संभाव्य संकटात शेतकरी आणि ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाने वेळेत पावले उचलावीत, हा या पत्रामागील मुख्य आग्रह आहे. आता पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन या मागणीची कितपत दखल घेतात आणि प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यासाठी कोणती पावले उचलतात, याकडे लक्ष राहणार आहे.

error: Content is protected !!