Names of BJP’s nominated members finalised : स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित, विरोधी पक्षांचा नावावर काथ्याकूट सुरूच
Akola महापालिका निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदांवर वर्चस्व प्रस्थापित करत चौथ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील शहर सुधार आघाडीने स्वीकृत नगरसेवक पदांसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे. सत्ताधारी गटातील संभाव्य उमेदवारांची नावे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेली नसल्याने महापालिका वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपसह शहर सुधार आघाडीकडून चार नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, ही नावे सध्या गोपनीय ठेवण्यात आली आहेत. भाजपचे माजी नगरसेवक सागर शेगोकार, गिरीश गोखले, तसेच महानगर विकास समितीचे नेते व माजी उपमहापौर सुनील मेश्राम यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडूनही एक स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी होत असल्याची माहिती आहे.
Sharad pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिलासादायक माहिती!
सत्ताधारी गटनेत्यांमार्फत ही नावे महापौर शारदा खेडकर यांच्याकडे सुपूर्द केली जाणार असून, १६ फेब्रुवारीनंतर होणाऱ्या महापालिकेच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही सभा महापालिकेतील पुढील सत्तासमीकरण स्पष्ट करणारी ठरणार आहे.
महापालिकेतील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता भाजपसह मित्रपक्षांना चार स्वीकृत नगरसेवक पदे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपकडून दोन, तर शहर सुधार आघाडीतील मित्रपक्षांकडून दोन जणांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे सत्ताधारी गटाचे संख्याबळ आणखी मजबूत होणार असल्याचे चित्र आहे.
संख्याबळानुसार काँग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून, काँग्रेसला दोन, तर उद्धवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र विरोधी पक्षांकडून अद्याप कोणत्या नावांवर अंतिम निर्णय झाला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विरोधकांची नावे अजूनही गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येते.
स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबरोबरच आता नगरसेवकांचे लक्ष स्थायी समिती सदस्यपद, सभापतीपदे तसेच विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांवर केंद्रित झाले आहे. सत्ताधारी गटाच्या पुढील राजकीय रणनीतीच्या दृष्टीने या निवडी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.








