Eknath shinde : शिवसेनेत फेरबदलाची चिन्हे; अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्याचे संकेत

eknath-shinde-shivsena-cabinet-reshuffle-organisational-restructure : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संघटनात्मक पुनर्रचनेच्या तयारीत

Mumbai : राज्यातील अलीकडील लोकसभा, पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांतील कामगिरीचा आढावा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठ्या फेरबदलाचे संकेत दिल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळालेल्या जिल्ह्यांचा सखोल आढावा घेऊन संघटनात्मक पुनर्रचना आणि मंत्रिमंडळात बदल करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मंत्र्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नसल्याची नोंद घेण्यात आली आहे. याप्रकरणी तीन ते चार मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्याचे समजते. आगामी काळात मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देत काही अकार्यक्षम मंत्र्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ACB traps Mantralaya: मंत्रालयात एसीबीचा सापळा; अन्न व औषध विभागातील लिपिक अटकेत

निवडणुकांतील यश-अपयशाचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटनबांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपण कुठे कमी पडलो, कोणत्या भागात संघटना कमजोर आहे आणि स्थानिक पातळीवरील नाराजीची कारणे काय आहेत, याची कारणमीमांसा करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.

पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या मंत्र्यांसाठी लिटमस टेस्ट ठरल्या असल्याचे बोलले जाते. अनेक ठिकाणी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असला तरी अपेक्षित कामगिरी साध्य झाली नसल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळातून कोणाला वगळले जाणार आणि कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईसह काही महत्त्वाच्या शहरी भागांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर वगळता इतर भागात कामगिरी मर्यादित राहिल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. निवडणुकीपूर्वी विविध जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष निकालांमध्ये त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही. काही ठिकाणी उमेदवारी वाटपावरूनही स्थानिक पातळीवर नाराजी असल्याची चर्चा आहे.

युतीतील जागावाटप आणि निवडणुकीतील रणनीती यावरही अंतर्गत पातळीवर पुनर्विचार सुरू असल्याचे सांगितले जाते. स्थानिक कार्यकर्त्यांकडून उमेदवार निवड, घराणेशाहीचे आरोप आणि प्रचारातील मर्यादा याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष अधिक संघटित करण्यासाठी आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भक्कम रणनीती आखण्यासाठी शिंदे सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

Akola civil hospital : मंत्र्यांच्या जावयाचे कंत्राट, सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या ताटात ‘तुरुंगासारखे’ अन्न!

राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना शिवसेनेतील संभाव्य फेरबदलांकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले असून, येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार किंवा बदलाबाबत औपचारिक घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.