
ऐन प्रचारात शिबिराचा घाट घातल्याने उलटसुलट चर्चांना उधाण
Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना, दुसरीकडे काँग्रेस पक्षाने आपल्या सर्व प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात गुंतवून ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भाजपने संपूर्ण ताकद आणि दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली असताना, ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसने शिबिराचा घाट घातल्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
या निवडणुकीत काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे, तर भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी देत ही जागा खेचून आणण्यासाठी कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (निवडणूक प्रभारी), सुधीर मुनगंटीवार (समन्वयक), आमदार प्रवीण दटकेंसह बंडखोरी करणारे अनिल सोले, गिरीश व्यास आणि संदीप जोशी यांसारख्या मुरब्बी नेत्यांवर भाजपने जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या सभा लावण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस दोन दिवस नागपुराच्या मुक्कामाला आले आहेत.
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या पदरी पाच हजारांची मदत; सरकारच्या घोषणेवर शेतकरी नेत्यांची नाराजी
या दरम्यान प्रचारसभा, बैठका, भेटीगाठी ते घेणार आहेत. एकीकडे भाजपने प्रचाराचा धडाका लावला असताना, पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांची ही निवडणूक असताना येथील नेते व पदाधिकाऱ्यांना पश्चिम विदर्भातील चिखलदऱ्यात दोन दिवसांच्या मुक्कामाला पाठवल्याने काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
शेतकर्यांना ५ हजारांची मदत अन् भाजप नेत्यांचा १०० कोटींचा गरबा
प्रदेश काँग्रेसच्या वतीने १७ आणि १८ ऑक्टोबर दरम्यान मेळघाटमधील राणीकोठी सभागृहात ‘लोकशाही मूल्यसंवर्धन अभियान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नेते विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला असून सर्व प्रमुख पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत. दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी, हे शिबिर आधीच ठरले होते आणि सर्वांना पूर्वसूचना दिली होती.
शिबिर संपताच आमचे नेते थेट प्रचारात उतरणार असून याचा आम्हाला निवडणुकीत अधिक फायदा होईल, असा दावा केला आहे. मात्र, प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ही रणनीती काँग्रेसला किती फायदेशीर ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








