
अतुल लोंढेंचा सरकारवर संताप, दुष्काळात अन्नदात्याची थट्टा करत असल्याची टीका
Nagpur राज्यात एकीकडे भीषण दुष्काळामुळे शेतकरी होरपळत असताना आणि सरकार तिजोरीत पैसे नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना अवघी पाच हजारांची तुटपुंजी मदत देत असताना, दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे नेते मात्र गरब्याच्या नावाखाली शंभर कोटींची उधळपट्टी करत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री कोट्यवधी रुपये उडवून या आवाहनाची पायमल्ली करत आहेत. मुख्यमंत्र्यांना पक्षातील नेते जुमानत नाहीत का असा थेट सवाल करत लोंढे यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
एमआयडीसीच्या भूसंपादनाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात; शेतकरी आंदोलनामुळे नेतृत्वाची कसोटी
अतुल लोंढे यांनी कंत्राटदारांकडून प्राप्त आकडेवारीचा हवाला देत भाजपच्या भव्य गरबा आयोजनाचा बुरखा फाडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या आयोजनाखाली दररोज कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. २४,००० पेक्षा जास्त चौरस फुटांचे ६० लाख रुपये खर्चाचे शामियाने, २,००० टन क्षमतेच्या एसीसाठी दररोजचा ७ लाखांचा खर्च, साऊंड-लाईट आणि गायकांवर रोजचे ५० लाख रुपये, तसेच रोषणाई व पंगतींवर १५ ते २५ लाख रुपये उडवले जात आहेत. नऊ दिवसांत तब्बल १०० कोटी रुपयांचा चुराडा करणाऱ्या या नेत्यांकडे एवढा पैसा आला कुठून, असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकरी दुष्काळात होरपळतोय, लोकप्रतिनिधी मात्र निवडणुकीच्या प्रचारात मग्न!
गरबा किंवा देवीच्या भक्तीला आमचा विरोध नाही, मात्र दुष्काळात शेतकरी उद्ध्वस्त होत असताना भक्तीच्या नावाखाली चाललेली ही श्रीमंतीची मिजास शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आणि त्यांची क्रूर थट्टा करणारी आहे, असा संताप लोंढे यांनी व्यक्त केला. स्वतःच्याच मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण उरले आहे का, असा सवाल करत लोंढे यांनी, मुख्यमंत्री या उधळपट्टी करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करून त्यांचा राजीनामा घेणार का अशी थेट मागणी केली असून या उधळपट्टीचे उत्तर सरकारने जनतेला दिलेच पाहिजे, असा इशाराही दिला.








