PMC Corporation : पुणे महापालिकेत सत्तेची सूत्रे पुन्हा जुन्याच कारभाऱ्यांच्या हाती!

pune-municipal-corporation-standing-committee-members-bjp-ncp-congress-appointments : स्थायी समितीवर भाजपचे १२; राष्ट्रवादी ३ आणि काँग्रेस १, भाजपचे वर्चस्व कायम

Pune : महापालिकेच्या नव्या सभागृहात स्थायी समितीसह विविध विषय समित्यांवरील सदस्यनियुक्ती जाहीर झाल्यानंतर सत्तेची सूत्रे पुन्हा जुन्याच कारभाऱ्यांच्या हाती जाणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. २०१७ च्या निवडणुकीत पुणेकरांनी स्पष्ट बहुमत देऊनही अनेक नगरसेवकांना केवळ मतदानापुरते मर्यादित ठेवण्यात आल्याची टीका विरोधकांसह सत्ताधारी गटातूनही झाली होती. नव्या कार्यकाळातही त्याच पद्धतीची पुनरावृत्ती होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महापालिका निवडणुकीत ११९ नगरसेवक निवडून देत पुणेकरांनी भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर स्थायी समिती व इतर विषय समित्यांवर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महत्त्वपूर्ण अधिकार असलेल्या स्थायी समिती आणि शहर सुधारणा समितीवर स्थान मिळवण्यासाठी विविध पक्षांच्या नगरसेवकांनी प्रयत्न सुरू केले होते.

Ganesh Naik : मंत्रिपद काय चाटायचंय का? नवी मुंबईतील भूखंड वाटपावरून गणेश नाईकांचा संताप

सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवर एकूण १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये भाजपचे १२, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३ आणि काँग्रेसचा १ सदस्य अशी रचना आहे. इतर विषय समित्यांवर प्रत्येकी १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक समितीवर भाजपचे १०, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचा १ सदस्य आहे. एकूण ९४ नगरसेवकांची विविध समित्यांवर नियुक्ती झाली आहे. या सदस्यांमधून संबंधित समित्यांच्या अध्यक्षांची निवड आठवडाभरात होणार आहे.

भाजपकडून मागील सत्ताकाळात सभागृहनेते राहिलेले ज्येष्ठ नगरसेवक गणेश बिडकर यांच्यावर पुन्हा सभागृहनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विषय समित्यांवर निवड झालेल्या अनेक सदस्यांनी यापूर्वीही महत्त्वाची पदे भूषविल्याने प्रशासनातील अनुभवाला प्राधान्य देण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र त्यामुळे नव्या चेहऱ्यांना मर्यादित संधी मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

स्थायी समितीवर भाजपकडून रूपाली धाडवे, कालिंदा पुंडे, जयश्री भूमकर, विशाल धनवडे, प्राची आल्हाट, दादा कोद्रे, श्रीनाथ भिमाले, मयुरी कोकाटे, वृषाली कामठे, संदीप बेलदरे, रत्नमाला सातव आणि निशा मानवतकर यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अमोल बालवडकर, वैशाली बनकर आणि सुहास टिंगरे यांना संधी देण्यात आली असून काँग्रेसकडून प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Reality of unemployment : एमबीए, एमसीए आणि अभियंते पोलीस शिपाई भरतीसाठी रांगेत !

विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, क्रीडा, शिक्षण आणि नाव समित्यांवरही पक्षनिहाय समतोल राखत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने प्रत्येक समितीवर १० सदस्य देत आपले बहुमत कायम ठेवले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला २ आणि काँग्रेसला १ अशी जागा देण्यात आली आहे. या रचनेमुळे निर्णय प्रक्रियेत भाजपचे वर्चस्व कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नव्या सभागृहात समित्यांची रचना जाहीर झाल्यानंतर पुन्हा सत्तेची सूत्रे अनुभवी नेत्यांकडेच केंद्रीत राहणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. गतवेळीप्रमाणेच बहुसंख्य नगरसेवकांना केवळ मतदानावेळी हात वर करण्यापुरतीच भूमिका उरणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी काळात समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीमुळे या सत्तासमीकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.