prashant-dikkar-swarajya-party-telhara-banana-insurance-claim-politics : बुलढाण्यातील बालेकिल्ला सोडून नव्या मतदारसंघाची चाचपणी?, दौऱ्याचा नवा अर्थ
Khamgao स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर हे गेल्या काही महिन्यांपासून मूळ बालेकिल्ला असलेल्या खामगाव परिसरात फारसे सक्रिय दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, आता त्यांचा मोर्चा शेजारच्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्याकडे वळल्याचे स्पष्ट दिसत आहे. डिक्कर यांच्या तेल्हारा मंडळातील वाढत्या फेऱ्या आणि शेतकरी प्रश्नांवरील आक्रमक पवित्रा यामुळे ते आगामी निवडणुकीत नवा मतदारसंघ शोधत आहेत का? अशा चर्चांनी आता खामगावसह अकोला जिल्ह्यातही जोर धरला आहे.
अलीकडेच तेल्हारा मंडळातील वगळलेला केळी फळबाग पीकविमा मंजूर झाल्याचा दावा डिक्कर यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर केला जात आहे. यासंदर्भातील माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करून त्यांनी तेल्हारा तालुक्यातील शेतकरी वर्गात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, राजकीय जाणकारांच्या मते, ही केवळ शेतकरी सेवा नसून त्यामागे एक मोठी राजकीय रणनीती दडलेली असू शकते.
Sanjay Gaikwad : हद्दवाढीवरून राजकारण; आमदारांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला विरोध कुणाचा?
प्रशांत डिक्कर यांची तेल्हाऱ्यातील सक्रियता ही ‘मिशन २०२६’ चा भाग असल्याचे मानले जात आहे. खामगाव मतदारसंघात प्रबळ राजकीय स्पर्धक असल्याने डिक्कर यांनी आता तेल्हारा-अकोट या पट्ट्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून धरत त्यांनी स्थानिक नेतृत्वासमोर आव्हान उभे केले आहे. तेल्हारा भागात स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद आणि गावोगावी होणाऱ्या बैठकांमुळे त्यांनी स्वराज्य पक्षाचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे.
तेल्हाऱ्यातील केळी विमा प्रश्नावर डिक्कर यांनी थेट कृषी आयुक्तालयापर्यंत पाठपुरावा केल्याचे सांगण्यात येते. हा विमा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना असली, तरी स्थानिक राजकीय नेत्यांनी याकडे ‘बाहेरच्यांचे अतिक्रमण’ म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. जळगाव आणि लगतच्या भागात सध्या सुरू असलेल्या ‘पीक विमा घोटाळ्या’च्या पार्श्वभूमीवर, डिक्कर यांनी या विषयावर घेतलेली आक्रमक भूमिका त्यांना राजकीय फायदा मिळवून देणारी ठरू शकते.
खामगावच्या राजकारणात सक्रिय असणारे डिक्कर अचानक तेल्हाऱ्यात ‘एक्स्ट्रा ॲक्टिव्ह’ झाल्याने, “भाऊ आता जिल्हा बदलणार का?” हा प्रश्न कळीचा ठरला आहे. जर त्यांनी तेल्हाऱ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर अकोला जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात.








