Operation Tiger : ‘ऑपरेशन टायगर’ सुरू? ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या आमदाराच्या भेटीला

Uddhav-Thackeray’s-corporator-meet-an-MLA-from-Eknath Shinde’s-camp : महापालिका समित्यांच्या निवडीपूर्वीच हालचालींना वेग, सदिच्छा भेट की भविष्यातील राजकीय भूकंप?

Mumbai मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या सत्तासमीकरणांचे संकेत देणारी खळबळजनक घडामोड समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. ठाकरे आणि शिंदे गटातील तीव्र राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, एका निष्ठावान गटाच्या नगरसेवकाने दुसऱ्या गटाच्या प्रभावी नेत्याची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मुंबई महानगरपालिकेतील आगामी निर्णयप्रक्रिया आणि विविध समित्यांच्या निवडींच्या काळामध्ये ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. जरी ही केवळ ‘शिष्टाचार भेट’ असल्याचे आणि आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यासाठी घेतली असल्याचे सांगण्यात येत असले, तरी राजकीय विश्लेषक याकडे संशयाने पाहत आहेत. विशेषतः महापालिकेत स्थायी समिती आणि इतर महत्त्वाच्या पदांच्या नियुक्त्यांचा पेच असतानाच ही भेट झाल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Ajit Pawar death : अजित पवारांची हत्या राजीव गांधींप्रमाणेच? अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप

ठाकरे गटातील एक युवा चेहरा म्हणून ओळखले जाणारे अंकित प्रभू या पावलाद्वारे नेमके काय संकेत देऊ इच्छितात, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे, शिंदे गटाकडून दोन स्वीकृत सदस्यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहे.

त्यात आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. राज सुर्वे यांच्या संभाव्य नियुक्तीबद्दल शुभेच्छा देण्यासाठीच प्रभू यांनी ही हजेरी लावल्याचे समजते. मात्र, दोन गटांमधील तणाव पाहता, ही भेट केवळ औपचारिकता आहे की भविष्यातील मोठ्या पक्षांतराची नांदी, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Lakhni APMC : संचालक मंडळाच्या भ्रष्टाचाराचा ‘काटा‘ काढला; लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि त्यानंतरची सत्तासमीकरणे राज्याच्या राजकारणासाठी नेहमीच निर्णायक ठरतात. अशा परिस्थितीत दोन परस्परविरोधी गटांतील नेत्यांमध्ये संवाद सुरू होणे, हे एखाद्या मोठ्या राजकीय उलथापालथीचे लक्षण मानले जात आहे. या भेटीमुळे ठाकरे गटात नाराजीचे सूर उमटण्याची शक्यता असून, आगामी काळात ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.