samruddhi-land scam : समृद्धी महामार्गात 1,150 कोटींचा जमीन घोटाळा, सीआयडी चौकशीची मागणी

samruddhi-mahamarg-1150-crore-land-scam-ambadas-danve-allegation-sandipan-bhumre-cid-demand : अंबादास दानवेंचा खासदार संदीपान भुमरेंवर गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar: समृद्धी महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जटवाडा येथील जमिनीच्या व्यवहारावरून जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर 1,150 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला आहे.

दानवे यांच्या आरोपानुसार, समृद्धी महामार्गालगत जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन ड्रायव्हरच्या नावे ‘हिबानामा’ (बक्षीस पत्र) करून बळकावण्यात आली. विशेष म्हणजे हा हिबानामा 1971 सालचा दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र संबंधित व्यक्ती जावेद रसूल शेख यांचा जन्म 1985 मध्ये झाल्याचे सांगितले जात असल्याने 1971 मध्ये त्यांच्या नावावर हिबानामा कसा होऊ शकतो, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला आहे.

Sharad Pawar Supriya Sule : पवार कुटुंबाचे व्याही आता भाजपचे सहकोषाध्यक्ष!

समृद्धी महामार्गासाठी या जमिनीचे संपादन करण्यात आले असून तिचे संपादन मूल्य तब्बल 1,150 कोटी रुपये निश्चित करण्यात आल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. इतक्या मोठ्या मोबदल्यासाठी काही जणांनी मालकी हक्काचा दावा करून रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात सविस्तर कागदपत्रांसह मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले. चौकशी झाल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल, असा त्यांचा दावा आहे.

Nagpur Municipal corporation : भाजपने मित्रपक्षांच्या नगरसेवकांना ठेवले वेटिंगवर!

दरम्यान, या आरोपांवर खासदार संदीपान भुमरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. कोणताही हिबानामा झालेला नाही. जावेद रसूल हा माझा ड्रायव्हर आहे, मात्र त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आरोपातील जावेद हा दुसराच कोणी असू शकतो,” असे भुमरे यांनी म्हटले. तसेच अंबादास दानवे यांनी आरोप सिद्ध करावेत, असे आव्हानही त्यांनी दिले.

समृद्धी महामार्गाच्या पार्श्वभूमीवर उभ्या राहिलेल्या या कथित जमीन व्यवहारामुळे राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाची चौकशी होणार का आणि सरकार याबाबत काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.