bhaskar-jadhav-attack-on-government-governor-speech-maharashtra-legislative-session-2026 : भास्कर जाधवांचा सभागृहात हल्लाबोल, लाडकी बहिण योजनेवरही टीका
Mumbai महाराष्ट्र विधानसभेच्या 2026 च्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, “सरकार इतकं लबाड आहे की त्यांनी राज्यपालांच्या तोंडूनही खोट्या गोष्टी बोलवून घेतल्या,” असा गंभीर आरोप केला.
जाधव म्हणाले की, राज्यपालांच्या भाषणात नेहमी सरकारच्या धोरणांची दिशा, तरुणांसाठीच्या योजना, शेतकऱ्यांसाठीच्या उपाययोजना आणि महिलांसाठीच्या उपक्रमांचा उल्लेख असतो. मात्र यावेळचे भाषण निरस, उत्साहहीन आणि दिशाहीन होते. “राज्यपाल साहित्यिक असावेत असं मला वाटतं,” असा टोला लगावत त्यांनी सरकारवर टीका केली.
samruddhi-land scam : समृद्धी महामार्गात 1,150 कोटींचा जमीन घोटाळा, सीआयडी चौकशीची मागणी
जाधव यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले. राज्यात 25 लाख तरुणांनी बेरोजगारीची नोंदणी केली असून एका वर्षात सातपट वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. “दावोस करारांचे गाजावाजा करता, पण रोजगार कुठे आहेत? सरकारने रोजगार वाढवला की बेरोजगारी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीकडेही त्यांनी लक्ष वेधले.
टाटा, वेदांत आणि बल्क ड्रग पार्कसारखे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला वळवण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला. “नवीन घोषणा करता, इव्हेंट करता; पण प्रत्यक्षात काहीच होत नाही,” अशी टीका त्यांनी केली. 2024 मध्ये ‘लाडका भाऊ’ योजनेतून 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगत, आजही ती तरुणाई नोकरीच्या शोधात भटकत असल्याचा दावा त्यांनी केला.
Sharad Pawar Supriya Sule : पवार कुटुंबाचे व्याही आता भाजपचे सहकोषाध्यक्ष!
2023 मध्ये 75 हजार नोकरभरतीचे आश्वासन देण्यात आले होते, त्याचे काय झाले, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला. “एक रुपया पीक विमा योजनेचे काय झाले? 12 हजार कोटी रुपये गोळा झाले, पण शेतकऱ्याला लाभ किती?” असा आरोप त्यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारक उभारण्याच्या घोषणेवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “किती निवडणुका झाल्या, पण स्मारकाचे काय झाले?” असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र भ्रष्टाचारात पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली.
Nagpur Municipal corporation : भाजपने मित्रपक्षांच्या नगरसेवकांना ठेवले वेटिंगवर!
तसेच, “ईव्हीएम बाजूला पडली, आता मतांना पैसे दिले जातात. बिनविरोध निवडणुका करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. लोकशाही वाचवली पाहिजे,” असे म्हणत त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. राज्यपालांची दिशाभूल केल्याचा आरोप करत, “सरकारचा निषेध आणि राज्यपालांबद्दल खेद,” अशी भूमिका जाधव यांनी मांडली.
अधिवेशनात झालेल्या या तीव्र टीकेमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पडली असून पुढील चर्चेत सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
___








