raksha-khadse-angry-on-officials-in-disha-meeting-for-pending-works : विसंगत माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांची रक्षा खडसेंनी घेतली झाडाझडती
Buldhana नेहमी संयमी स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार रक्षा खडसे यांचा एक आक्रमक पैलू नुकत्याच पार पडलेल्या ‘दिशा’ समितीच्या बैठकीत पाहायला मिळाला. जिल्ह्यातील रखडलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत, काही विभागांच्या अधिकाऱ्यांनी अपुरी आणि विसंगत माहिती सादर केल्याने वातावरण चांगलेच तापले. कामकाजातील या ढिलाईवर संताप व्यक्त करत, ताईंनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारल्याने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
बैठकीदरम्यान विविध सरकारी योजनांची सद्यस्थिती, निधीचा वापर आणि कामांची गती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, अनेक विभागांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि वारंवार सूचना देऊनही कामे प्रलंबित राहिल्याने केंद्रीय मंत्र्यांचा संयम सुटला. “जनतेच्या प्रश्नांवर कुठलीही तडजोड चालणार नाही,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
त्याचवेळी रखडलेल्या कामांच्या संदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. या कडक भूमिकेमुळे आता प्रशासकीय अधिकारी कामाला लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दिशा समितीच्या बैठकीत रक्षा खडसे यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. रखडलेल्या विकासकामांना गती देण्यासाठी हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे.








