व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण भाजपमध्ये निष्ठावंतांची नाराजी उफाळली? मोहन बळींच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

भाजपमध्ये निष्ठावंतांची नाराजी उफाळली? मोहन बळींच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

चापलुसी करणाऱ्यांना पदे मिळतात; ओबीसी मोर्चाच्या प्रदेश सचिवांची सूचक टीका

Washim : निवडणुकीच्या काळात पक्षासाठी जीवाचे रान करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सत्तेची आणि पदांची संधी मिळताना मात्र डावलले जाते, अशी खंत भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन बळी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण आणि पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, ही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद आहे की पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना दिलेला अप्रत्यक्ष इशारा, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

निवडणुकीच्या काळात ऊन – पावसाची तमा न बाळगता पक्षाचा प्रचार करणारे, संघटन मजबूत करण्यासाठी मेहनत घेणारे आणि कठीण परिस्थितीतही पक्षाशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते निवडणुकीनंतर मात्र दुर्लक्षित होतात. दुसरीकडे, केवळ होयबा आणि चापलुसी करणाऱ्यांना महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या दिल्या जातात, अशी नाराजी बळी यांनी आपल्या पोस्टमधून मांडली आहे.

विशेष म्हणजे, या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्याही नेत्याचे अथवा पदाधिकाऱ्याचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे त्यांच्या टीकेचा रोख नेमका कोणाकडे आहे, याबाबत तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. मात्र, निष्ठावंतांच्या योगदानाची दखल घेतली जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी पक्षांतर्गत नेतृत्व आणि निर्णयप्रक्रियेकडे लक्ष वेधले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासनही धुडकावले; आष्टीत शेतकऱ्यांचा चक्काजाम कायम!

पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य संधी मिळण्याऐवजी वरिष्ठांच्या जवळीकतेला महत्त्व दिले जात असल्याची भावना संघटनेतील काही कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे या पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. निवडणुकीपुरता कार्यकर्त्यांचा वापर करून नंतर त्यांना बाजूला करण्याच्या प्रवृत्तीवरही बळी यांनी अप्रत्यक्षपणे बोट ठेवले आहे.

दरम्यान, भाजपसारख्या शिस्तबद्ध संघटनात्मक रचनेचा दावा करणाऱ्या पक्षातच अशा प्रकारची सार्वजनिक नाराजी व्यक्त होत असल्याने या पोस्टला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. बळी यांच्या विधानावर पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

विरोधकांकडे मुद्देच उरले नाहीत; त्यामुळे राजकीय षडयंत्रांचा मार्ग – महायुती नेत्यांचा आरोप

एकीकडे पक्षविस्तार आणि संघटनात्मक बळकटीकरणाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे निष्ठावंतांच्या सन्मानाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे मोहन बळी यांची ही पोस्ट केवळ वैयक्तिक नाराजी आहे की भाजपमधील अंतर्गत अस्वस्थतेचे संकेत, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

error: Content is protected !!