खासदार प्रतिभा धानोरकर आणि श्यामकुमार बर्वे यांच्या बसमधील व्हीडीओवरून वाद
Nagpur : दिल्लीतील आंदोलनादरम्यान बसने प्रवास करताना चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यावरून राजकीय वर्तुळात टीकाटिपणी सुरू झाली आहे. मात्र, आमचे संबंध भावा-बहिणीसारखे असून हसतखेळत संभाषण सुरू होते असे स्पष्ट करत दोन्ही खासदारांनी वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत आयोजित आंदोलनासाठी विरोधी पक्षांचे सर्व खासदार बसने एकत्र जात होते. प्रवास दरम्यान खासदार धानोरकर आणि बर्वे यांच्यात चाललेल्या संभाषणावेळी खासदार बर्वे यांनी धानोरकर यांच्या गालावर हळूच चापट मारली. या प्रसंगाचे चित्रीकरण बसमधीलच एका महिला खासदाराने केले होते आणि नंतर तो व्हीडीओ खासदार धानोरकर यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला.व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर खासदार बर्वे यांनी महिला खासदारासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप करत विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनीसुद्धा याची तक्रार राहुल गांधी यांच्याकडे केली असल्याचे समोर आले आहे.
भाजपमध्ये निष्ठावंतांची नाराजी उफाळली? मोहन बळींच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण
मात्र श्यामकुमार बर्वे हे माझ्या भावासारखे आहेत. बसमधील तो प्रकार म्हणजे आमच्यातील कौटुंबिक गंमतजंमत होती. त्यांनी मारलेल्या चापटीचा कोणताही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही किंवा ही गोष्ट तक्रार करण्यासारखीही नाही, असे सांगत धानोरकर यांनी वादातील हवा काढून घेतली. प्रतिभा धानोरकर माझ्या बहिणीसारख्या आहेत. आमच्यातील साध्या मस्करीचा चुकीचा अर्थ काढून कुणीही अफवा पसरवू नये, असे आवाहन खासदार बर्वे यांनी केले आहे.








