rajyasabha-election-sharad-pawar-candidature-bjp-fifth-candidate-maharashtra : राज्यसभा निवडणुकीत, दोन्ही आघाड्यांची ‘वेट अँड वॉच’ भूमिका
Mumbai : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारीवरून महाविकास आघाडीत अद्याप एकमत झालेले नाही. अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक असतानाही अधिकृत यादी जाहीर न झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः शरद पवार यांना उमेदवारी द्यावी की नाही, यावरून मतभेद असल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जर शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली नाही तर भारतीय जनता पार्टी पाचवा उमेदवार मैदानात उतरवण्याची रणनीती आखू शकते. अशा परिस्थितीत भाजपचे पाच, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभेसाठी रिंगणात उतरेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राज्यसभेच्या एकमेव जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा हवाला देत काँग्रेसकडून आग्रह कायम असल्याचे सांगितले जात आहे, तर शिवसेनाही जागेसाठी ठाम आहे. संख्याबळाच्या आधारे सेनेचा दावा अधिक मजबूत मानला जात असला तरी अंतिम निर्णय प्रलंबित आहे.
शिंदेंच्या शिवसेनेकडून राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. त्याचबरोबर ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम आणि गजानन किर्तीकर यांचीही नावे चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील सात जागांसाठी १६ तारखेला मतदान होणार आहे. महायुतीकडे सहा आणि महाविकास आघाडीकडे एक जागा असल्याचे गणित आहे. भाजपला चार, शिंदे गटाच्या शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे, तर भाजप आणि शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे.
Sunil tatkare controversy : अजित पवार हयात असताना दिलेले सेल अध्यक्षांचे राजीनामे मंजूर !
देशभरात राज्यसभेच्या ३७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून महाराष्ट्रातून सर्वाधिक सात सदस्य निवडले जाणार आहेत. तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, तेलंगणा, छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
उमेदवारी अर्जासाठी वेळ कमी उरला असताना दोन्ही आघाड्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय काय होतो आणि भाजप त्यानुसार कोणती रणनीती आखते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








