28 paper leak cases in congress government, Chandrashekhar bawankule claims: काँग्रेसच्या काळात २८ वेळा पेपर फुटी, नेत्यांची नौटंकी सुरू असल्याची टीका
Nagpur राज्यात सुरू असलेल्या पेपर फुटीच्या वादावरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात तब्बल २८ वेळा पेपर फुटले होते, अशी आठवण करून देत बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर होत असलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. धर्मेंद्र प्रधान यांनी कोणताही पेपर फोडलेला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसची ही केवळ ‘नौटंकी’ असल्याची टीका केली.
पेपर फुटी प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली की, सरकारची जी काही जबाबदारी आहे, ती पूर्णपणे स्वीकारण्यात आली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र चौकशी समिती नेमण्यात आली आहे. असे असतानाही विरोधकांकडून केवळ राजकीय स्वार्थापोटी युवकांची माथी भडकवण्याचे आणि दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
याच दरम्यान, नुकत्याच झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसेवरही महसूलमंत्र्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आंदोलन सुरू असताना तीन ट्रक भरून दगड कोणी आणले आणि ही दगडफेक नेमकी कोणी केली, याचाही सविस्तर तपास करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे,असे सांगत त्यांनी यामागील षढयंत्राचा पर्दाफाश केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.








