both-shivsena-tie-up-for-junnar-panchayat-samiti : भाजप-राष्ट्रवादी सत्तेपासून दूर, बहुमतासाठी फक्त एका सदस्याची होती गरज
Pune पुणे जिल्ह्यातील जुन्नर पंचायत समितीत राजकीय स्तरावर मोठी आणि अनपेक्षित घडामोड घडली आहे. एकमेकांवर सातत्याने टीका करणारे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने स्थानिक पातळीवर हातमिळवणी केली आहे. या नव्या समीकरणामुळे पंचायत समितीवरील सत्तास्थापनेत मोठा बदल झाला असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सत्तेपासून दूर राहिले आहेत.
जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चांचे फेरे सुरू होते. या समितीत शिंदे गटाच्या शिवसेनेचे ८ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे ६ सदस्य, तर भाजप आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी १ सदस्य निवडून आले होते. बहुमतासाठी किमान एका अतिरिक्त मताची गरज असल्यामुळे सत्तेची समीकरणे गुंतागुंतीची झाली होती.
maharashtra budget session 2026 : विधिमंडळात प्रश्न अन् जिल्हा उपनिबंधकांची उचलबांगडी!
या पार्श्वभूमीवर अनेकांना अपेक्षा होती की शिंदे गट महायुतीचा भाग असल्यामुळे भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन करेल. मात्र राजकारणात वेगळेच चित्र पाहायला मिळाले. शिंदे गटाने भाजपला बाजूला ठेवत ठाकरे गटाच्या सदस्याला सोबत घेत सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला. या अनपेक्षित युतीमुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.
या नव्या समीकरणानुसार पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) च्या कमल शेळकंदे यांची निवड करण्यात आली. तर उपसभापती पदासाठी ठाकरे गटाला संधी देण्यात आली असून त्या पदावर अमित ढोले यांची निवड झाली आहे. या निर्णयामुळे दोन्ही शिवसेना गटांनी स्थानिक पातळीवर एकत्र येत सत्ता स्थापन केल्याचे स्पष्ट झाले.
Amravati Politics : दर्यापूर काँग्रेसला खिंडार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजपमध्ये
या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज्यात शिवसेनेचे दोन गट वेगवेगळ्या राजकीय आघाड्यांमध्ये असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये परिस्थितीनुसार नवे समीकरण तयार होत असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारचे स्थानिक स्तरावरील राजकीय प्रयोग दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








