Anger-among-corporators-as-water-is-supplied-only-once-every-eight-days : आठ दिवसांआड पाणी मिळत असल्याने नगरसेवकांमध्ये संताप
Akola अकोला शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून मंगळवारी झालेल्या महापालिका स्थायी समितीच्या सभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधकांसह सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही प्रशासनावर तुटून पडले. सात-आठ दिवसांनी पाणी मिळत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी असून, समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नगरसेवकांनी प्रशासनाला दिला.
स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत जलप्रदाय विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. शिवसेना (उबाठा)चे सागर भारुका, काँग्रेसचे फलउर्रहमान, वंचित बहुजन आघाडीचे नीलेश देव तसेच भाजपचे विनोद मापारी यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारला.
शहराला काटेपूर्णा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून सध्या साठा सुमारे ४७ टक्के आहे. मात्र, त्यानंतरही जुन्या शहर भागात सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. हद्दवाढ भागात परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले. अनेक ठिकाणी जलकुंभांची संख्या अपुरी असून काही भागात कोणतीही पूर्वसूचना न देता तीन-चार दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला.
काही ठिकाणी पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १२ ते १ अशी सांगितली जाते; मात्र प्रत्यक्षात पुरवठा दुपारी उशिरा किंवा सायंकाळी सुरू होतो. अनेकदा सायंकाळी सुरू झालेला पुरवठा रात्रीपर्यंत चालतो. काही व्हॉल्वमन आपल्या सोयीप्रमाणे वेळ बदलून पाणी सोडतात, अशी तक्रारही नगरसेवकांनी सभेत केली. यावर सभापती अग्रवाल यांनी सर्व नगरसेवकांना संबंधित समस्यांबाबत लेखी माहिती देण्याचे निर्देश दिले. तसेच संबंधित विभागांची तातडीने बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आदेश देत दोषी आढळणाऱ्या व्हॉल्वमनवर कारवाई करण्याचेही स्पष्ट केले.
दरम्यान, पाणीपुरवठ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कुरघोडीचे वातावरणही दिसून आले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, तर सत्ताधारी भाजपचे काही नगरसेवकही प्रशासनाला प्रश्न विचारताना आक्रमक झाले. शहर सुधार आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन झाल्यानंतरही पाण्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावरून राजकीय कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र सभेत दिसून आले.
सभेत शहर नझूल शीट क्रमांक ३९-बी, भूखंड क्रमांक ८२/१ व ८२/२ (भाटे क्लबजवळ) येथील शासनाच्या मालकीच्या सुमारे एक लाख चौरस फूट जागेवर नाट्यगृह, व्यापारी संकुल आणि वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. २००७ मध्ये या जागेसाठी प्राथमिक निविदा प्रक्रिया झाली होती; मात्र प्रकरण न्यायालयात गेल्याने काम रखडले.
सध्या भूखंडाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून रामदास पेठ येथील सांस्कृतिक भवनाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मनपाला स्वतंत्र नाट्यसंकुलाची गरज नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे आधीची निविदा प्रक्रिया रद्द करून जागा मिळण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
नगरसेवकांनी शहरातील अनेक भागात पाणीपुरवठ्याचा दाब कमी असल्याची तक्रारही केली. आधीच सात-आठ दिवसांनी पाणी मिळत असताना पुरवठ्याच्या दिवशीच पाइपलाइनची कामे केली जात असल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
Akola municipal corporation : अकोला महापालिकेतील ‘क्लब टेंडर’वरून वाद
तांत्रिक कारणांमुळे अनियमितता होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; मात्र तांत्रिक बिघाड नसतानाही अनेक भागात समस्या का निर्माण होते, असा सवाल करत नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच जलकुंभांची नियमित स्वच्छता होत नसल्याने काही वेळा गढूळ पाणीपुरवठा होतो, असा आरोप करीत नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये, असा इशाराही देण्यात आला.








