complaint-registered-in-shirdi-ajit-pawar-plane-crash : शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नोंदवली तक्रार
Shirdi बारामतीजवळ झालेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या दुर्घटनेबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण समोर यावे आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
माहितीनुसार, शिर्डी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत पोलिसांकडे अर्ज सादर केला. या अर्जात विमान दुर्घटनेत काही गंभीर निष्काळजीपणा झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या नेतृत्वात हा अर्ज शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यात बारामती परिसरात झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील काही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. या अपघाताचे नेमके कारण काय होते, विमानाची तांत्रिक स्थिती योग्य होती का, तसेच उड्डाणापूर्वी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
Mahayuti government : स्मशानभूमी नसेल तर गावांना विकास निधी मिळणार नाही!
तक्रारीत विमान कंपनीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विमानाची आवश्यक तपासणी आणि देखभाल योग्य पद्धतीने करण्यात आली होती का, याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा नियमभंग झाल्याचे आढळले, तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असेही तक्रारदारांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही सातत्याने चौकशीची मागणी केली आहे. दुर्घटनेबाबत अनेक शंका निर्माण होत असल्याने या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, असे त्यांनी यापूर्वीही म्हटले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा केल्याची माहितीही समोर आली होती.








