Donald trump : “मोजतबा खामेनी जिवंत नसल्याचं ऐकलंय”; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

donald-trump-claim-on-mojtaba-khamenei-death-status-latest-iran-news : म्हणाले – जिवंत असतील तर आत्मसमर्पण करा

Washington : इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र आणि सध्या नेतृत्वाची धुरा सांभाळत असल्याचे मानले जाणारे मोजतबा खामेनी जिवंत नसल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच ते जिवंत असतील तर त्यांनी आत्मसमर्पण करावे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, शनिवारी एनबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोजतबा खामेनी यांच्या हयातीबाबत शंका उपस्थित केली. ५६ वर्षीय मोजतबा खामेनी जिवंत असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असा दावा त्यांनी केला. सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला संदेश सार्वजनिक भाषणाऐवजी लेखी स्वरूपात देण्यात आला होता. ते जिवंत आहेत की नाही, याची स्पष्ट माहिती नाही आणि आतापर्यंत कोणीही त्यांना सार्वजनिकरित्या दाखवलेले नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.

Dada Bhuse : पवित्र पोर्टलशिवाय झालेल्या शिक्षक नियुक्त्यांना मान्यता नाही

मोजतबा खामेनी यांच्या अस्तित्वाबाबत अनेक अफवा पसरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपण ऐकले आहे की ते जिवंत नाहीत. मात्र ते जिवंत असतील तर त्यांनी आपल्या देशासाठी शहाणपणाचा निर्णय घ्यावा आणि आत्मसमर्पण करावे, असे वक्तव्यही ट्रम्प यांनी केले.

दरम्यान, मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात संयुक्त लष्करी कारवाई केल्याचे वृत्त समोर आले होते. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला असून त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही यात मृत्यू झाल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर प्रादेशिक पातळीवर तणाव वाढला आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सुपुत्र मोजतबा खामेनी यांनी इराणचे नेतृत्व स्वीकारल्याचे सांगितले जाते. मात्र सत्ता हाती घेतल्यानंतर ते एकदाही सार्वजनिकरित्या दिसले नसल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या हयातीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Uddhav thackeray shivsena : कार्यकर्ते थेट पोहोचले ‘मातोश्री’वर! उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

दरम्यान, या हल्ल्यात मोजतबा खामेनी गंभीर जखमी झाल्याचीही काही माध्यमांमध्ये चर्चा झाली होती. मात्र हा दावा इराणच्या अधिकृत सूत्रांकडून फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे मोजतबा खामेनी यांच्या हयातीबाबत अद्यापही स्पष्टता नसल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.