व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच

महाविकास आघाडीही मैदानात, राजकीय बैठकांचा धुरळा!

Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तेवर महायुतीने संचालकांच्या संख्याबळाच्या जोरावर पकड मिळवली असली, तरी अध्यक्षपदाचा तिढा अद्याप कायम आहे. बँकेचे अध्यक्षपद नेमके कोणत्या पक्षाकडे जाणार, यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीनेही निवडणुकीत उमेदवार उतरविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याने बँकेतील राजकीय वातावरण तापले आहे.

बँकेच्या अध्यक्ष आणि दोन उपाध्यक्षांची निवड सोमवारी होणार आहे. त्यापूर्वी रविवारी दोन्ही राजकीय आघाड्यांच्या स्वतंत्र बैठका होत असून, या बैठकांमध्ये सत्तास्थापनेचे गणित मांडले जाणार आहे. त्यामुळे रविवार बँकेच्या राजकारणासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप या तिन्ही पक्षांचा सत्तेतील सहभागाचा आग्रह आहे. संचालकांच्या संख्याबळाचे गणित महायुतीच्या बाजूने असले, तरी अध्यक्षपद आणि दोन उपाध्यक्षपदांचे वाटप करताना पक्षीय समतोल राखण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे.

पदवीधरमधील भाजपच्या पराभवाचे धागेधोरे विद्यापीठापर्यंत

याच पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू आहे. पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख यांच्यासह तिन्ही पक्षांचे नवनिर्वाचित संचालक आणि पदाधिकारी या विषयावरील तोडगा काढण्यासाठी एकत्र येत आहेत. अध्यक्षपदासाठी संभाव्य नाव, उपाध्यक्षपदांचे वाटप आणि सत्तेतील सहभागाचे सूत्र यावर यावेळी चर्चा अपेक्षित आहे.

महायुतीच्या बैठकीनंतर राजकीय घडामोडींकडे लक्ष असतानाच महाविकास आघाडीनेही आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. रविवारी दुपारी आघाडीच्या संचालकांची बैठक होणार आहे. काँग्रेसचे नेते, नवनिर्वाचित संचालक तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा मार्ग, मुनगंटीवारांनी राजधानीत उलगडली अमूल्य विचारधारा

अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची की नाही, उमेदवार कोण असावा आणि निवडणुकीत कोणती भूमिका घ्यावी, यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकीकडे महायुतीतील पदवाटपाचा पेच, तर दुसरीकडे महाविकास आघाडीची संभाव्य उमेदवारी, यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक केवळ संख्याबळापुरती मर्यादित राहिलेली नाही. सोमवारी होणाऱ्या निवडीत अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार आणि उपाध्यक्षपदांचे सूत्र कसे ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!