नोव्हेंबरमध्ये कन्याकुमारी ते दिल्ली मार्च; आरक्षणाच्या संरक्षणासाठी समाजाने एकजूट होण्याचे आवाहन
Wardha : जातनिहाय जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना असणे अत्यंत आवश्यक आहे. जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद झाली, तरच समाजाची खरी लोकसंख्या स्पष्ट होऊन त्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. या मागणीसाठी आता व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार केला असून, येत्या नोव्हेंबरमध्ये कन्याकुमारी ते दिल्ली असा अन्न मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा ओबीसी नेते तथा सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक विजय वडेट्टीवार यांनी केली.
वर्ध्यातील शिववैभव सभागृहात ओबीसी जनगणना आयोजन महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी जनजागृती संघटना आणि विविध समविचारी सामाजिक संस्थांच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ही परिषद आयोजित करण्यात आली. या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना वडेट्टीवार यांनी ओबीसी जनगणना, आरक्षणाचे संरक्षण आणि समाजाच्या संघटनात्मक ताकदीवर भर दिला.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या कन्याकुमारी ते दिल्ली अन्न मार्चची सुरुवात सुमारे दोन हजार वाहनांसह करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसींच्या हक्कांसाठी आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी ही चळवळ व्यापक करणे आवश्यक आहे. जातनिहाय जनगणनेच्या लढ्यात प्रत्येकाने सहभागी व्हावे. आजच्या संघर्षाचा संबंध केवळ वर्तमानाशी नसून पुढील पिढ्यांच्या भविष्याशी आहे. मुलांचे शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण सुरक्षित राहण्यासाठी समाजाने जागरूक राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
समाजाने संतांच्या पुरोगामी विचारांचा स्वीकार करून विवेकवादी मार्गाने वाटचाल करावी. भोंदूगिरी आणि अंधश्रद्धेच्या आहारी न जाता शिक्षण, संघटन आणि हक्कांच्या लढ्याला प्राधान्य द्यावे. दिवाळीत ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना रकान्याच्या मागणीसाठी प्रत्येकाने एक दिवा लावून या विषयाबाबत जनजागृती करावी, असेही वडेट्टीवार म्हणाले.
महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते. त्यांनी ओबीसी समाजाच्या विकासासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, देवळीच्या नगराध्यक्षा किरण ठाकरे, काँग्रेस नेते अभ्युदय मेघे, शेखर शेंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संघटनेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ॲड. अर्चना पेठे यांनी केले, तर प्रास्ताविक शंकर प्रपाट यांनी केले. राजेंद्र कळसाईत यांनी आभार मानले. महापरिषदेला वर्धा जिल्ह्यासह परिसरातील नागरिक आणि ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
___








