bjp-mla-narendra-mehta-land-mafia-mention-government-letter-controversy-bawankule-patole-clash : काँग्रेस-भाजप आमने-सामने, बावनकुळे-पटोले यांच्यात आरोप-प्रत्यारोप
Mumbai: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याबाबत एका सरकारी पत्रात ‘भूमाफिया’ असा उल्लेख करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यात जोरदार वाद रंगला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 जून 2025 रोजी महसूल विभागाकडून पाठवण्यात आलेल्या एका पत्रात “भूमाफिया नरेंद्र लालचंद मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन यांनी न भरलेल्या मुद्रांक शुल्क व दंडाच्या रक्कमेची वसुली” असा उल्लेख करण्यात आला आहे. या पत्रात संबंधित प्रकरणाची सात दिवसांत चौकशी करून त्याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले जाते. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे पत्र माध्यमांसमोर आणत गंभीर आरोप केले असून या पत्रावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्वाक्षरी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नाना पटोले यांनी नरेंद्र मेहता यांच्यावर स्टॅम्प ड्युटी न भरल्याचा तसेच आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा आरोप करत सरकारवर दबाव आणला जात असल्याचे म्हटले आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर कारवाई करावी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच हे पत्र सभागृहात मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Apex bank case : २५ हजार कोटींच्या शिखर बँक प्रकरणाचा शेवट; पवार कुटुंबियांना क्लीनचिट
दरम्यान, या सर्व आरोपांवर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, मंत्री म्हणून प्राप्त तक्रारींच्या आधारे संबंधित बाबींवर कार्यवाही करण्यासाठी पत्रव्यवहार केला जातो. संबंधित पत्रात आमदार असा कुठेही उल्लेख नसून केवळ नावाच्या आधारे तक्रार पुढे पाठवण्यात आली आहे. या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढलेला नसून चौकशीअंती वस्तुस्थिती समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नाना पटोले राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
बावनकुळे यांनी पुढे सांगितले की, नरेंद्र मेहता यांच्याविरोधात यापूर्वीही काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, मात्र त्यामध्ये कोणताही दोष सिद्ध झालेला नाही. सध्याच्या तक्रारीचीही नियमानुसार चौकशी केली जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
दुसरीकडे, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपण कोणताही गैरव्यवहार केलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. आपल्यावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून कोणतीही थकबाकी नसल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास सत्य समोर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
LPG shortage : हॉटेल्स, रेस्टॉरेंट्सला प्राधान्यक्रम का नाही?
या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. आगामी काळात या प्रकरणाचा राजकीय परिणाम काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








