maharashtra-hailstorm-rain-alert-22-districts-imd-yellow-alert-march-2026 : २२ जिल्ह्यांत येलो अलर्ट; पुढील काही तास अत्यंत धोकादायक
Mumbai: भारतीय हवामान विभागाने विभागाने राज्यासाठी हवामानाचा गंभीर इशारा जारी केला असून महाराष्ट्रातील तब्बल २२ जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून ऐन मार्च महिन्यात राज्यभर अवकाळी पावसासह गारपीट होत असल्याने नागरिक आणि शेतकरी वर्ग चिंतेत आहे. पुढील काही तास विशेषतः धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील विविध भागात काल मोठ्या प्रमाणावर पावसासह गारपीट झाली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत पाऊस कोसळला. यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पावसामुळे पिकांची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २० मार्च २०२६ पर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
Vikas thakre vs narendra jichkar : काँग्रेसची ठाकरे सेना आता जिचकारांच्या आर्थिक नाड्या आवळणार !
सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असून विजांचा कडकडाटही मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
काल झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले. सांगली शहर आणि मिरज तालुक्यात तुफानी गारपीट झाली. बेडग आणि आरग परिसरात गारांचा अक्षरशः पाऊस पडला. हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हळद आणि गहू उत्पादकांची मोठी धांदल उडाली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातही जोरदार पावसासह गारपीट झाली असून सांगवी, घोळसगाव आणि बोरगाव परिसरातील शेतीला फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी आणि द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस सतर्क राहण्याचा इशारा दिला असून नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, तसेच शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.








