unseasonal-rain-hailstorm-crop-damage-maharashtra-farmers-loss-vidarbha-marathwada : विदर्भ, मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रात पिकांचे मोठे नुकसान
Mumbai : राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांना अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या हवामान बदलामुळे काढणीस आलेली गहू, हरभरा, मका, कांदा तसेच आंबा आणि इतर फळबागा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्या आहेत.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांत गारपिटीसह पावसाची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात वीज पडून जनावरे दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या अवकाळी पावसामुळे गव्हासह फळपिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.
Raj thackeray : राज ठाकरेंचा फडणवीसांवर कर्जाच्या मुद्द्यावर हल्लाबोल
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा, पारनेर, पाथर्डी भागांत वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या पावसामुळे गहू, मका, कांदा तसेच चाऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागली.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी आणि माढा तालुक्यांनाही गारपिटीचा फटका बसला. माढा तालुक्यातील मोडनिंब, अरण आणि बावी परिसरात सुमारे अर्धा तास गारांचा पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, गहू, ज्वारी आणि कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. बार्शी तालुक्यातील कुसळंब, पांगरी आणि कारी परिसरातील शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली असून उन्हाळी पिके आडवी पडली आहेत.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यालाही सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. मालेगाव शहर व तालुक्यात गुढीपाडव्याच्या संध्याकाळी सुमारे एक तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून शेतातील पिके आडवी पडली आहेत. नामपूरसह मोसम खोऱ्यात आणि सटाणा तालुक्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत.
Ashok kharat case : रुपाली पाटील-ठोंबरेंच्या ‘फरार’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेला कांदा, गहू आणि मका पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. हवामान खात्याने २२ मार्चपर्यंत अशाच प्रकारच्या अवकाळी पावसाचा इशारा दिला असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.








