Breach of privilege motion in the Assembly by Krishna Khopde against Abhijit Wanjari : पूर्व नागपुरात ‘आमदार’कीचा वाद पेटला; राजकीय वर्तुळात खळबळ
Nagpur पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय संघर्षाचा दुसरा अंक आता अधिक तीव्र झाला आहे. एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांच्यातील वाद आता थेट विधानसभेपर्यंत पोहोचला आहे. वंजारी हे जाणीवपूर्वक नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा ठपका ठेवत खोपडे यांनी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काही वर्षांपूर्वी पूर्व नागपूर विधानसभा निवडणुकीत कृष्णा खोपडे यांनी अभिजित वंजारी यांचा पराभव केला होता. त्यानंतर वंजारी हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आणि सध्या ते विधान परिषदेत काँग्रेसचे प्रतोद म्हणून कार्यरत आहेत.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) सुटली होती, तरीही खोपडे यांनी आपले वर्चस्व राखत मोठा विजय मिळवला.विवाद सुरू झाला तो वंजारी यांच्या कार्यालयावरील फलकामुळे (बोर्ड). वंजारी यांनी पूर्व नागपुरात आपले कार्यालय थाटले असून, त्यावर ‘आमदार, पूर्व नागपूर’ असा उल्लेख केला आहे. यावर भाजपचा तीव्र आक्षेप आहे. वंजारी हे विधान परिषदेचे सदस्य असताना स्वतःला एका ठराविक मतदारसंघाचे आमदार म्हणून मिरवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप खोपडे यांनी केला आहे.
Ashok kharat case : फडणवीस सरकार उलथवण्यासाठी विधी – संजय राऊतांचा गंभीर आरोप !
याच फलकावरून यापूर्वी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. भाजप कार्यकर्त्यांनी वंजारींच्या फलकाला काळे फासल्याने मोठा राडा झाला होता. दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकांसह पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती. महानगरपालिका निवडणुकीनंतर हा वाद शांत झाल्याचे वाटत असतानाच, आमदार खोपडे यांनी हक्कभंग दाखल करून या वादाला पुन्हा एकदा फोडणी दिली आहे.पूर्व नागपूर हा एकेकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी यांचा बालेकिल्ला मानला जात असे. मात्र, कृष्णा खोपडे यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर चतुर्वेदींची राजकीय पकड ढिली झाली.
Sanjay gaikwad : आरोग्य भरतीत कंत्राटी घोटाळा? आमदार गायकवाड यांचा दावा
त्यानंतर अभिजित वंजारी, पुरुषोत्तम हजारे आणि दुनेश्वर पेठे यांनी नशीब आजमावले, मात्र खोपडे यांचा विजयरथ कोणालाही रोखता आला नाही. लोकसभा निवडणुकीतही नितीन गडकरी यांना या मतदारसंघातून ८० हजारांची आघाडी मिळाली होती, तर खोपडे स्वतः १ लाखांच्या विक्रमी मताधिक्याने निवडून आले आहेत. आता हक्कभंगाच्या या कारवाईमुळे हा राजकीय संघर्ष कोणते वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








