lpg-gas-cylinder-weight-reduction-government-decision-india-gas-shortage-news : जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर कमी वजनात गॅस पुरवठ्याचा निर्णय
New Delhi : जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे नागरिकांना मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरमध्ये पूर्वीप्रमाणे 14.2 किलो गॅस न भरता केवळ 8 ते 10 किलो गॅसच देण्यात येणार आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर कमी दिवस पुरणार असल्याने सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या देशात वापरला जाणारा घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर 14.2 किलोचा असतो. मात्र, जागतिक परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याने सरकारने गॅस कंपन्यांना सिलेंडरमध्ये कमी प्रमाणात गॅस भरण्याचे निर्देश दिले आहेत. सिलेंडरचा आकार आणि स्वरूप तसेच राहणार असून त्यामध्ये भरण्यात येणाऱ्या गॅसचे प्रमाण कमी केले जाणार आहे. ग्राहकांकडूनही तेवढ्याच प्रमाणात शुल्क आकारले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Datta meghe : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ता मेघे यांचे निधन
मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम झाला आहे. इराण आणि अमेरिका तसेच इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे गॅस फील्ड आणि खनिज तेल साठ्यांवर हल्ले झाले आहेत. या घटनांमुळे नैसर्गिक वायूच्या उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील काही महिन्यांत गॅसची टंचाई कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशातील काही भागांमध्ये गॅस तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले आहे. सरकारकडून वारंवार आवाहन करण्यात येत असले तरी नागरिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. कमी वजनाच्या सिलेंडरमुळे घरगुती वापराचे नियोजन बिघडण्याची शक्यता असून, विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना त्याचा अधिक फटका बसू शकतो.
दरम्यान, गॅस तुटवड्याचा परिणाम व्यावसायिक क्षेत्रावरही झाला आहे. काही दिवसांपूर्वी व्यावसायिक एलपीजी गॅसचा पुरवठा कमी करण्यात आल्याने हॉटेल आणि खाद्य व्यवसायावर परिणाम झाला होता. मात्र, परिस्थितीचा आढावा घेत महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक एलपीजी गॅस पुरवठ्यात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हॉटेल्स, ढाबे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम इतर उद्योगांवरही होताना दिसत आहे. कच्च्या मालाच्या आयातीवर परिणाम झाल्याने मिनरल वॉटर उद्योगात खर्च वाढला आहे. प्रीफॉर्म, कॅप, लेबल आणि पॅकेजिंग साहित्यांच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम उत्पादन खर्चावर झाला आहे. त्यामुळे बाजारात पाण्याच्या बॉटलच्या दरात वाढ झाल्याचे चित्र आहे.
जागतिक परिस्थिती सामान्य होईपर्यंत गॅस पुरवठ्यातील अडचणी कायम राहण्याची शक्यता असून सरकारकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, नागरिकांनी गॅसचा वापर संयमाने करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.








